
>> वर्णिका काकडे
भौगोलिक क्षेत्र सोडून विशिष्ट समाज, जाती जमाती ज्या प्रदेशात विखुरलेला असतो तिथे त्यांची विशिष्ट भाषा बोलली जाते. या भाषेला त्या जाती जमातीच्या नावानेच ओळखले जाते. त्या त्या समूहानुसार या बोलीचे उपपप्रकारही आढळतात. भटक्या विमुक्त जाती जमातीतील अशीच एक बोली म्हणजे कैकाडी समाजाची कैकाडी ही बोली.
महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील कैकाडी ही एक भटकी विमुक्त जमात. हे मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी होते व नंतर कर्नाटक व महाराष्ट्र प्रांतात आले असे मानले जाते. त्याच्या कैकाडी या बोलीभाषेत कानडी आणि तेलुगू शब्दांचा भरणा असतो. काहींच्या अभ्यासकांच्या मते ते तामिळनाडूमधून आले असावेत. तमिळ भाषेत हात कापणारे आणि हाताने कापणारे, असा कैकाडीचा अर्थ होतो. तामिळनाडूमध्ये त्यांना कोरवा या नावाने ओळखले जाते. मात्र तामिळमधील कैकाडी समाजाच्या बोलीत तिथल्या प्रांताचा मुख्य प्रभाव आहे, महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशात मात्र या बोलीत सारखेपणा आढळतो.
महाराष्ट्रात उर कैकाडी ऊर्फ गाव कैकाडी ऊर्फ कोरवा, पाल्मोर ऊर्फ धुंताळे व माकडवाले अशा तीन पोट जाती आढळतात. गावात राहून आपला पूर्वापार बुरूडकामाचा धंदा करणाऱया कैकाड्यांना कैकाडी म्हटले जाते. पाल्मोर गारूड्याप्रमाणे सापांचा खेळ करून उदरनिर्वाह करतात, तर कुंची कोरवा जातीचे लोक विक्रीसाठी कुंचले वा कुंची तयार करतात. त्यांच्या भाषेला कोरवी, कैकाडी अथवा कुलूर म्हणतात.
सदैव भ्रमणात राहिल्याने या बोलीमध्ये विविध शब्द आहेत. आपली कौशल्ये आपल्याच समाजात राहावा यासाठीही या विशिष्ट बोली विकसित होत त्यांचा वापर होत राहिला. परंतु कालानुपरत्वे जसजसे या जमातीतील परंपरागत व्यवसाय करण्याचे प्रमाण कमी झाले तसे बोलीचा वापर कमी होत मराठी, कानडी, तेलुगू या भाषांमध्ये संवाद साधण्याचे प्रमाण वाढत गेले. याचा परिणाम मुख्यत व्यवसायाशी संबंधित शब्दांवर झाला असून अनेक शब्द आता बोलीतून हद्दपार झाले आहेत. तसेच शिक्षणाचा परिणाम होत प्रमाण भाषेतील अनेक शब्द पर्याय म्हणून बोलीभाषेत वापरले जात आहेत. सहजपणा व सोपी सुटसुटीत शैली ही बोलीभाषांची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच या बोली वेगवेगळ्या ठिकाणी बोलल्या जात असल्या तरी काही विशिष्ट भागामध्ये या बोलींची विशिष्ट शैली व लय दिसून येते.





























































