
दिल्लीतील श्रीराम कॉलेजच्या शताब्दी महोत्सवात विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजकीय भाषण केले. काँग्रेससह देशातील विरोधी पक्षांवर टीकाटिप्पणीवरच त्यांचे भाषण केंद्रित होते. ‘जीडीपी वाढीच्या 7.8 टक्के दरामुळे देशाचा आत्मविश्वास वाढला आहे, पण काहींना हे आकडे पचवणे कठीण जात आहे,’ अशी टीका मोदींनी केली.
काँग्रेसच्या राजवटीचा इतिहास त्यांनी पुन्हा उगाळला. काँग्रेसला त्यांनी ‘नाराज फुफा’ आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला त्यांनी ‘झूठ की गूंज’ असे म्हणून हिणवले. ‘काही नाराज फुफा प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. मात्र सत्याच्या हुंकारापुढे खोटय़ाची ‘गूंज’ टिकणार नाही,’ असे मोदी म्हणाले.
…तर आम्ही घरात घुसून मारतो!
माओवाद, नक्षलवाद आणि दहशतवाद आता संपला आहे. ‘दहशतवाद पसरवणाऱयांची आता पळापळ झाली आहे. पाकिस्तानने काही कुरापत काढली तर हिंदुस्थानी सैन्य घरात घुसून मारते, असे ते म्हणाले.
ही पीआर मोहीम – काँग्रेस
‘मोदींचे हे भाषण म्हणजे प्रसिद्धी मोहीम आहे. शाळा, महाविद्यालये बंद पडत आहेत. एक परीक्षा नीट घेता येत नाही आणि हे पीआर मोहीम चालवत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली.



























































