
पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील कोलमडलेल्या पायाभूत सुविधांविरोधात आयटी कर्मचारी आणि स्थानिकांनी रस्त्यावर उतरून काढलेल्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. हिंजवडीसह पुणे आणि परिसरातील औद्योगिक वसाहती तसेच आयटी पार्कमध्ये नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला असून, सरकार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करून शांत बसल्याचा संताप रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकांऊंट एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. आयटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. पुणे आणि आसपासच्या सर्वच औद्योगिक व आयटी क्षेत्रांत रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी आणि स्वच्छता यांसारख्या पायाभूत सुविधांची पूर्णपणे दैना उडालेली आहे. असे असतानाही सरकार कोणतीही ठोस उपाययोजना न करता शांत बसले आहे, अशी टीका त्यांनी केली.
हिंजवडीत पायाभूत सुविधांसाठी IT कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनी काढलेल्या मोर्चाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. पुणे आणि परिसरातील MIDC भाग असो किंवा IT Park, या सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या आहेत आणि सरकार त्याबाबत काहीही उपाययोजना न करता शांतपणे बसलंय. सरकारने तातडीने…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 6, 2026
सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हिंजवडी आणि इतर सर्व आयटी व औद्योगिक परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तात्काळ ठोस पावले उचलली नाहीत, , तर आज हिंजवडीत नागरिकांच्या आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या रूपाने दिसणारा हा संताप भविष्यात अधिक तीव्र आणि उग्र रूप धारण करेल. यानंतर उद्भवणाऱ्या तीव्र आंदोलनाला आणि परिस्थितीला सर्वस्वी राज्य सरकारच जबाबदार असेल, असा थेट इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.

























































