
भारतीय जनता पक्षाला धार्जिणे असलेले भ्रष्ट मनोवृत्तीचे लोक महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर नेमण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्यपालांनी लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. लोकसेवा आयोग ही संवैधानिक संस्था असून ती राज्यपालांच्या अखत्यारीत येते, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत रविवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व विविध शासकीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो परीक्षार्थींच्या न्याय्य मागण्यांसाठी पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी अलका टॉकीज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघणार असून याला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही पाठिंबा दिला आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत जे मत मांडलेले आहे ते शंभर टक्के सत्य आहे.
महाराष्ट्रातील लोकसेवा आयोग ही एक संवैधानिक संघटना आहे. त्याला राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्व आहे. महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकारी देण्याचे काम लोकसेवा आयोग करते. यामुळे राज्याचा लोकसेवा आयोग आणि त्या माध्यमातून होणारी भरती प्रक्रिया, परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष असावी म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगाची स्थापना केली, भाजपने नाही. अशावेळेला या संस्थांचे पावित्र्य आणि महत्त्व जपण्याचे काम प्रत्येक राज्यकर्त्याचे असायला पाहिजे. पण गेल्या 10 वर्षांत, विशेषत: देवेंद्र फडणवीस जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या प्रत्येक वेळेला लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून हजारो, लाखो विद्यार्थ्यांचा छळच झाला, असा घणाघात संजय राऊत यांनी केली.
फडणवीसांच्या काळात कधी परीक्षेत घोटाळे, तर कधी भरतीत घोटाळे झाले. याचे कारण असे की, त्या आयोगावर आपला माणूस आणून त्या माध्यमातून आपल्या माणसांना मदत व्हावी ही भूमिका भाजपची सर्वत्र राहिली आहे. मग राम मंदिर ट्रस्ट असो, महाराष्ट्राचा लोकसेवा आयोग असो, नीट असो, युपीएससी असो, मेडिकल कौन्सिल असो किंवा कोर्ट असो… या प्रत्येक ठिकाणी फक्त आमचा माणूस लावायचा. म्हणूनच आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
आज हजारो विद्यार्थी रस्त्यावर आहेत. हे विद्यार्थी फक्त रस्त्यावर असून ते जर लोकसेवा आयोगाच्या दिशेने चालायला लागले, तर आयोगाच्या कार्यालयाला टाळे लागले जाईल. त्यामुळे सगळ्यात आधी देवेंद्र भडणवीस यांनी हा आयोग पूर्णपणे बरखास्त करायला पाहिजे. राज्यपालांनी लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. हे राज्यपालांच्या अखत्यारीत येते. कारण ती संवैधानिक संस्था आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, राज्यातील परीक्षा संदर्भात सुधारणा करण्यासाठी 7 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. हे सात लोक कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का? हे भाजपचेच लोक आहेत. जर या देशाच्या न्याय व्यवस्थेचे, संवैधानिक संस्थांचे संघीकरण झाले असेल तर सनदी अधिकाऱ्यांमध्येही एक असतोच ना, असेही संजय राऊत म्हणाले.

























































