
>> शृतिका शेलार जाधव
अवघ्या पाच दिवसांवर लाडक्या गणरायाचे आगमन होणार असून त्यापाठोपाठ येणाऱ्या गौराईच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरू आहे. यंदा हसरा चेहरा, गालावर खळी आणि अमरावती पॅटर्नच्या गौराईच्या मुखवट्यांना मोठी पसंती मिळत आहे. हे मुखवटे इतके सुरेख आणि बोलके आहेत की, जणू काही खरीखुरी गौराईच समोर उभी असल्याचा भास होतो. हे मुखवटे पर्यावरणपूरक असून त्यावर हाताने केलेले आकर्षक रंगकाम, सोनेरी नथ, ठसठशीत कुंकू असल्यामुळे खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत तुफान गर्दी केली आहे.
अमरावती स्पेशल मुखवट्यांची किंमत १५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत आहे. तर कमी बजेटमध्ये फायबर आणि पीओपीचे मुखवटे ३५० पासून ३ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत. बाजारात कापडी, माती आणि फायबरच्या मूर्ती उपलब्ध आहेत. कापडी मूर्तीची सुरुवात ५०० रुपयांपासून होते तर मातीच्या मूतींची किंमत ८०० रुपयांपासून पुढे आहे. फायबर मूर्तीना मागणी जास्त असून ३ हजार ५०० रुपयांपासून याची किंमत सुरू होते. मुखवट्याविना पूर्ण गौराईची किंमत ८ हजारांपासून सुरू होते. मात्र त्यात खुर्ची येत नाही. तसेच मॅट आणि ग्लॉसी मुखवट्यांना ग्राहकांची मोठी मागणी आहे, अशी माहिती व्यावसायिक स्वप्नील तंटक यांनी दिली. सुबक, विविध आकाराच्या, आखीव रेखीव मुखवटे आणि सजलेल्या गौरी बाजारात प्रत्येकाचे लक्ष वेधत आहेत.
माहेश्वरी, चेक्स इरकल साड्यांची क्रेझ
गौराईला नेसवण्यात येणाऱ्या साडीमध्ये यंदा माहेश्वरी आणि चेक्स इरकल साडीची अधिक क्रेझ आहे. या साड्यांना महिलांनी अधिक पसंती दिली आहे. तसेच बाजारात गौरीसाठी विशेष छोट्या आकाराच्या साड्या उपलब्ध आहेत. याचबरोबर पैठणी, नऊवारी, महाराणी साडी, पेशवाई, गोल सहावार या साड्यांनादेखील मागणी जास्त आहे.
नवी आभुषणे
गौराईला सजवण्यासाठी विविध प्रकारचे दागिनेही बाजारात उपलब्ध आहेत. यात मोहनमाळ, कोल्हापुरी साज, बोरमाळ, लक्ष्मीहार, राणीहार, बोरमाळ, मंगळसूत्र, नथ, कंबरपट्टा, बांगड्या, कानातले या दागिन्यांचा समावेश आहे. तसेच अष्टपैलू माळ, मोत्याचे काप, एकविरा कंठी, थौजा मंगळसूत्र, घुंगरू तोडे, गुलाब तोडे, ठुशी तोडे, जडाऊ नथ, चंद्रकोर नथ, मोती चंद्रकोर खोपा, चोकर, चिंचपेटी, तीन पदरी मोत्यांची माळ, डायमंड कोल्हापुरी साज, पुतळी हार, झिलमिल पैजण ही नवी आभुषणे गौराईसाठी बाजारपेठेत आली, असे महिला व्यावसायिक जयश्री रमाणे यांनी सांगितले.
- मुखवट्यांमध्ये कोरीव डोळे आणि नाजूक डिझाईनच्या मुकुटांना अधिक मागणी पाहायला मिळतेय.
- गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुखवट्यांची किंमत १० टक्क्यांनी वाढली आहे.
- हसरा चेहरा, खळी मुखवटा, अमरावती मुखवटा, एकविरा मुखवटा, सातारी मुखवटा, महालक्ष्मी मुखवट्यांना विशेष मागणी आहे.






























































