
अतिवृष्टीत गणेश मंडळांनी उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे. प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळाने भाविक, स्वयंसेवक, गणेशमूर्ती आणि मंडपाची सुरक्षितता ही सर्वात पहिली जबाबदारी मानावी, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.
मंडळांनी मंडपाची रचना, छत, ताडपत्री, लोखंडी स्ट्रक्चर, विद्युत जोडणी आणि जनरेटरची व्यवस्था यांची तातडीने तपासणी करावी. पाणी साचलेल्या ठिकाणी विद्युत उपकरणे किंवा उघडय़ा तारा राहणार नाहीत, याची विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक मोठ्या मंडळाने आपल्या स्वयंसेवकांची स्वतंत्र आपत्कालीन टीम तयार ठेवावी. पालिका, पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कासाठी जबाबदार व्यक्ती निश्चित असावी. मंडप परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यास किंवा संरचनेला धोका निर्माण होत असल्यास भाविकांची गर्दी नियंत्रित करावी आणि आवश्यकतेनुसार प्रशासनाच्या सूचनांचे तत्काळ पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे ऍड. नरेश दहिबावकर यांनी केले.
घाबरू नका…संकटाशी लढा!
गणेशोत्सवात आग किंवा कोणतीही आपत्कालीन स्थिती निर्माण झाली तर घाबरून न जाता त्या संकटाशी लढण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून आपत्कालीन विभागाकडून वॉर्ड स्तरावर आग प्रतिबंध व सुरक्षेबाबत प्रशिक्षण आणि जनजागृती करण्यात येत आहे. पालिकेच्या ‘डी’ वॉर्डमध्ये आपत्कालीन विभागाकडून बुधवारी आगप्रतिबंधक उपाययोजना आणि आपत्कालीन सुरक्षेबाबत धडे देण्यात आले.


























































