
हिंदुस्थानामध्ये होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाशी संबंधित माहिती योग्य त्या कायदेशीर अंमलबजावणी यंत्रणांना देण्याचे सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटाने मान्य केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह आणि हानिकारक मजकूर तसेच भारतीय कायद्यांचे पालन या मुद्द्यांवर सरकारसोबत चर्चा सुरू असतानाच मेटाने ही भूमिका स्पष्ट केली आहे.
एनआयला दिलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानामध्ये कार्यरत असलेल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी मुलांची ऑनलाइन सुरक्षा हा ‘मूलभूत तत्त्वाचा’ भाग आहे. याबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बाल सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक ती माहिती कायदेशीर अंमलबजावणी यंत्रणांना देण्यात येणार आहे असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मुलांसाठी अधिक सुरक्षित करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पहिले पाऊल असल्याचे मेटाकडून सांगण्यात आले आहे. आगामी काळातही बाल सुरक्षेसाठी अधिक सजगपणे उपाययोजना केल्या जातील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, मेटासोबत झालेल्या चर्चांमध्ये भारतातील कायद्यांचे पालन, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील मजकुरावर नियंत्रण, अल्गोरिदमची कार्यपद्धती आणि यंत्रणांवरील नियंत्रण यांसह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यापूर्वी झालेल्या बैठकींमध्ये कायद्यांचे पालन करण्याच्या प्रक्रियेबाबतही विविध तपशील मागवण्यात आले होते.
मेटाने केवळ अमेरिकेत लागू असलेल्या कायद्यांच्या आधारे भारतात काम करणे पुरेसे ठरणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचे समजते. भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांनी देशातील कायद्यांसोबतच समाजाप्रती असलेली जबाबदारीही लक्षात घेणे आवश्यक आहे. विशेषतः मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेच्या बाबतीत अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.




























































