
यंदाच्या मान्सूनने देशाची चिंता वाढवली आहे. १ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत देशभरात सरासरीपेक्षा १४ टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे. आता मान्सूनच्या माघारीसाठी पोषक वातावरण तयार होत असून, १९ सप्टेंबरच्या आसपास पश्चिम राजस्थानमधून मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी व्यक्त केली.
देशातून मान्सून माघारी फिरण्याची सामान्य तारीख १७ सप्टेंबर आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मान्सूनची माघार होत असून, ही प्रक्रिया साधारण १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होते. त्यानंतर द्वीपकल्पीय भारतात ईशान्य मान्सूनला सुरुवात होते.
यंदा आतापर्यंत झालेली पावसाची तूट पाहता, मान्सूनचा हंगाम संपेपर्यंत ती १० टक्के किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे. देशाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. १० टक्के किंवा त्याहून अधिक पावसाची तूट ही दुष्काळसदृश स्थिती मानली जाते. याचा परिणाम शेतीबरोबरच धरणांमधील पाणीसाठा आणि जलविद्युत निर्मितीवरही होऊ शकतो.
IMDने आधीच दिला होता कमी पावसाचा अंदाज
मे महिन्यातच IMDने यंदाचा जून ते सप्टेंबरदरम्यानचा मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. त्यावेळी पावसाची तूट राहण्याची शक्यता ६० टक्के असल्याचे सांगण्यात आले होते. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून कमजोर राहण्याचा अंदाज होता. एल निनोचा संबंध भारतातील अधिक उष्ण उन्हाळा आणि कमकुवत मान्सूनशी जोडला जातो.
खरीप पेरणीवर मात्र मोठा परिणाम नाही
पावसाची एवढी मोठी तूट असतानाही खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. ११ सप्टेंबरपर्यंत यंदाची खरीप पेरणी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत केवळ १.५ टक्क्यांनी कमी आहे.
मात्र, पेरणीचे क्षेत्र टिकून राहिले असले तरी शेतकऱ्यांची चिंता संपलेली नाही. पावसाअभावी पिकांच्या उत्पादनावर किती परिणाम झाला, हे ऑक्टोबरपासून काढणी सुरू झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.




























































