
आजचा दिवस ओरॅकलमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी अखेरचा ठरला. सकाळी 4 वाजता कर्मचाऱ्यांचा अॅक्सेस बंद करण्यात आला, तर 6 वाजता त्यांना ई-मेल करून तुमचा आजचा अखेरचा दिवस आहे, असे सांगून ओरॅकल कंपनीने अमेरिकेत हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी काढून टाकले आहे. कंपनीने जगभरात कर्मचारी कपात सुरू केली असून हिंदुस्थानात किती कर्मचाऱ्यांची नोकरी जाईल, याबद्दल ओरॅकलने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
ओरॅकल कंपनी कर्मचारी कपात करून एआय आणि क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक वाढवत आहे. कंपनीने सकाळी 4 वाजता कंपनीच्या सिस्टिममध्ये कर्मचाऱ्यांचे लॉग-इन बंद केले.
5 वाजता मेसेजिंग अॅप स्लॅकमधून कर्मचारी आपोआप लॉग-आऊट झाले. ऑफिसच्या गेटवरील एन्ट्री कार्डने प्रवेश देणे बंद केले. सकाळी 6 वाजता कंपनी व्यवस्थापनाकडून एक ई-मेल पाठवण्यात आला. त्यात लिहिले होते, कंपनीतील बदलामुळे तुमचे पद रद्द केले जात आहे. आज तुमचा शेवटचा दिवस आहे. कंपनीच्या या तडकाफडकी निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.
टेक्निकल टीममधील डेटा सेंटर आणि क्लाऊडची सुरक्षा पाहणारे कर्मचारी, सॉफ्टवेअर डेव्हलपरमधील फ्यूजन, नेटसूट आणि एचआर सॉफ्टवेअर बनवणारी टीम, सेल्स व सपोर्टमधील सेल्स एक्झिक्युटिव्ह आणि ग्राहकांना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ओरॅकलने या वर्षी 13 टक्के म्हणजेच 21 हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.

























































