पिके करपली; 13 जिल्हे संकटात मंत्रिमंडळ बैठकीत चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसामध्ये दोन ते तीन आठवड्यांचा खंड पडल्याने राज्यातल्या किमान तेरा जिह्यांमध्ये पिके धोक्यात आली आहेत. मूग, सोयाबीन, उडीद, कापूस तूर व अन्य पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. कमी पावसामुळे शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येण्याची चिन्हे आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही सध्याच्या पावसाच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विविध जिह्यांमधील पीक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

पिकांच्या वाढीवर परिणाम

नाशिक जिह्यात देवळा, सटाणा, मालेगाव, नांदगाव, येवला, नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा तालुक्यात तीन आठवडय़ांपासून पावसाने दडी मारली आहे. पाऊसचा खंड वाढला तर पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील पावसाच्या स्थितीबाबत अर्धा-पाऊण तास चर्चा झाली. प्रत्येक जिल्हय़ाचे सादरीकरण झाले. कुठल्या तालुक्यात काय स्थिती आहे, पावसाचा खंड किती याची माहिती घेतली. टंचाई, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. एनडीआरएफच्या निकषांनुसार आपल्याला सर्व्हे 5 ऑक्टोबरनंतर करावा लागतो. त्याच्या आधीचा सर्व्हे मदतीकरता पात्र होत नाही. पण आपण 5 ऑक्टोबरपर्यंत थांबणार नाही. मदतीच्या उपाययोजनांची माहिती घेण्यास सुरुवात केली. 5 ऑक्टोबरचा सर्व्हेही करू.

कोकणातील परिस्थिती

रत्नागिरी जिह्यातील दापोली, मंडणगड तालुका, सिंधुदुर्ग जिह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात कमी पावसामुळे तुरळक ठिकाणी पिकांवर ताण आला आहे. कोकणात पावसाची आवश्यकता आहे. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अमरावती, नागपूर जिह्यांत अनेक ठिकाणी पावसाअभावी रोवणी प्रलंबित आहे.

मदतीचा आराखडा

राज्यात अनेक जिल्हय़ांमध्ये पावसाचा ताण 30 दिवसांवर गेला आहे. टंचाई, दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांची तयारी सुरूदेखील करण्यात आली आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. संपूर्ण मदत करण्याची तयारी सुरू केली असून त्याचा आराखडाही तयार करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

या जिह्यांमध्ये 50 ते 75 टक्के पाऊस

सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर