दीड महिन्यापासून पाऊस नाही… खरीप पिके करपली… पिण्यासाठीही पाणी मिळेना; मराठवाड्यात भीषण दुष्काळ, मंत्रिमंडळ बैठकीत चिंता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रानोमाळ पसरलेली भयाण शांतता… चारा-पाण्याअभावी बाजाराच्या वाटेला लागलेली जनावरे… आटलेले पाणवठे… बाजारपेठांना आलेली मरणकळा… आभाळाकडे लागलेल्या भकास नजरा… भीषण दुष्काळाने मराठवाड्याची अशी दैना मांडली आहे. पावसाने तर जणू मराठवाड्याशी सात जन्माचे वैर साधले आहे. दीड महिन्यापासून आकाशातून थेंबही न पडल्याने सोनं पिकवणाऱ्या जमिनीवरील सोयाबीन करपले, कापूस खुरटला. मका, तूर, मूग, उडदानेही माना टाकल्या. काय करावे, कुणापुढे हात पसरावे… पाठिराखा देवच मराठवाड्यावर रुसला आहे. शासनाने केलेल्या पीकपाणी अहवालातून मराठवाड्याचे हे विदारक दुष्काळी वास्तव समोर आले आहे.

पावसाचा रुसवा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजला आहे. कधी धो-धो बरसून शेतशिवाराचा जलाशय करणार, तर कधी दडी मारून जुलैमध्ये आला, पण लगेच बेपत्ता झाला. अन्निनोचे संकट आहे, पेरणी संयमाने करा, असा सल्ला सरकारने दिला. तोपर्यंत बहुतेक शिवारपेरणी आटोपली होती. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीन, कापसासह इतर खरीप पिके तरारली. मात्र नंतरची सारी नक्षत्रे कोरडी गेली. ऑगस्टमध्ये पावसाने तोंडच दाखवले नाही. सप्टेंबरमध्येही भुरभुर पाऊस आला. जवळपास दीड महिन्याचा खंड पडला. जमिनीतल्या ओलीवर पिके कशीबशी तगली. परंतु आता मात्र सोयाबीन, कापूस पूर्ण हातचा गेला आहे. खरीपच हातचा गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर मराठवाड्याच्या आठही जिल्हयातील लहानमोठी धरणेही खपाटीला गेली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही आ वासून उभा आहे.

धाराशिव जिल्ह्याची स्थिती अधिकच नाजूक

धाराशिव जिल्हयात वार्षिक सरासरीच्या ५१ टक्के पाऊस झाला आहे. जुलै ते सप्टेंबर असा पावसाचा मोठा खंड असल्यामुळे सोयाबीन, कापसासह इतर पिके खुरटली आहेत. जिल्हयात लहानमोठे २२५ प्रकल्प आहेत. सध्या या प्रकल्पात मोजकाच साठा उपलब्ध आहे. जिल्हयात भूजल पातळीत ७.२ मीटरने घट झाली आहे.

बीड जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड

यंदाच्या पावसाळी हंगामात बीड जिल्ह्यात पावसाचे सर्वाधिक खंड पडले आहेत. या जिल्हयात आतापर्यंत केवळ २९६.५ मि.मी. ५२.४ म्हणजे टक्के पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्यात ४१.६ टक्के, गेवराई ३७.४ टक्के वडवणी-४०.५टक्के आणि शिरूर कासार तालुक्यात ४८.५ टक्के पाऊस कमी झाला आहे. सर्वाधिक तूट गेवराई तालुक्यात ३८ दिवस आहे. अन्य तालुक्यात आष्टी-२९, माजलगाव-२७, धारूर-२५, आणि वडवणी १७ दिवसांची तूट आहे. जिल्हयातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांत केवळ १६.६९ टक्के पाणीसाठा आहे. एकूण १६४ प्रकल्पांपैकी ३१ प्रकल्प सध्याच कोरडे पडले आहेत. ७२ प्रकल्प मृत साठ्याच्या पातळीखाली गेले असून ५० प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पाऊस नसल्यामुळे जिल्हयातील खरीप पिके पूर्णतः बाधित झाली आहेत. या जिल्हयातील ११ तालुक्यात कोरडे दिवस अधिक असल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

नांदेड, हिंगोली जिल्हयात जमिनीतील ओलावा घटला

नांदेड जिल्ह्यावर पावसाने मेहेरबानी केली. त्यामुळे खरीप पिकांची वाढ चांगली झाली. मात्र आता पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ८ ते १९ दिवसांचा पावसाचा खंड हा जमिनीतील ओलावा कमी होण्यास कारणीभूत ठरला आहे. अशीच काहीशी परिस्थिती हिंगोली जिल्हयाची आहे. या जिल्हयात सरासरी ६३.१ टक्के पाऊस झाला आहे. या जिल्हयात सोयाबीन, कापूस, तूर याबरोबरच हळदीचे पीक घेतले जाते. याही जिल्हयात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांच्या उत्पादनात ४५ ते ५० टक्के घट होण्याची शक्यता बळावली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये २१ दिवस पावसाचा खंड

छत्रपती संभाजीनगर जिल्हयात यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत ८२.९० टक्के पाऊस झाला असला तरीही ८४ महसूल मंडळापैकी ३० मंडळात २१ दिवसांपेक्षा अधिकचा खंड पडला आहे. पावसात खंड पडल्यामुळे कापूस, मका, सोयाबीनसह अन्य खरीप पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बळावली आहे. या जिल्हयात सरासरी ४५ ते ५० टक्के खरिपाचे उत्पादन घटणार आहे. परतीचा पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. जालना जिल्हयाची अवस्था अशीच आहे.

लातूर, धाराशिव, बीडला जबर फटका

पावसाच्या ओढीचा सर्वांत मोठा फटका लातूर, बीड, धाराशिव या तीन जिल्हयांना बसला आहे. या तीनही जिल्हयांतील खरीप पिकांची माती झाली असून, धरणांमधील पाणीसाठाही तळाला गेला आहे. लातूरमध्ये वार्षिक सरासरीच्या केवळ ४४.५ टक्के पाऊस झाला आहे. लातूरमध्ये पावसाचा खंड हा ५१ दिवसांचा आहे. पाऊसच नसल्यामुळे मांजरा आणि तेरणा ही दोन्ही मोठी धरणे तहानलेली आहेत.