अजमेर शरीफमध्ये शाहरुखचे 5 हजार रुपये हरवले, फकिर म्हणाला ‘तू 500 कोटी कमावशील’; किंग खानने सांगितला किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

किंग खान शाहरुखचा दबदबा आजही बॉलिवूडमध्ये कायम आहे. मात्र, या यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी शाहरुखने आयुष्यात अनेक संघर्षांचा सामना केला. त्याच्या संघर्षाच्या काळातील अजमेर शरीफमधील एक किस्सा काही वर्षांपूर्वी त्याने स्वतः सांगितला होता. त्यावेळी दर्ग्यात त्याचे ५ हजार रुपये हरवले होते. विशेष म्हणजे, एका फकिराने हेच ५ हजार रुपये हरवल्याचे सांगत भविष्यात शाहरुख ५०० कोटी रुपये कमावेल, अशी भविष्यवाणी केली होती.

एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शाहरुखने हा किस्सा सांगितला होता. त्याची आई आजारी होती आणि तिच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तो तिच्यासोबत अजमेर शरीफला गेला होता. त्यावेळी आईने सुरक्षित ठेवण्यासाठी शाहरुखकडे ५ हजार रुपये दिले होते. मात्र, काही वेळाने हे पैसे हरवल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो दर्ग्यात पैसे शोधू लागला. याचवेळी दर्ग्यातील एका फकिराने शाहरुखशी संवाद साधला. ‘काही हरवले आहे का?’ असा प्रश्न त्याने विचारला. शाहरुखने होकार दिल्यानंतर फकिराने थेट ते ५ हजार रुपये असल्याचे सांगितले. हे ऐकून शाहरुखला आश्चर्य वाटले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, त्या फकिराने शाहरुखला सांगितले होते, ‘तू इथे आला आहेस, त्यामुळे रिकाम्या हाताने परत जाणार नाहीस. तुझे ५ हजार रुपये गेले आहेत, पण तू ५०० कोटी रुपये कमावशील.’शाहरुखने सांगितले होते की, तो अशा प्रकारच्या भविष्यवाणीवर सहज विश्वास ठेवत नाही. मात्र, त्याच्यासोबत घडलेला हा प्रसंग त्याच्या मनात कायम राहिला. ‘कधीकधी माझा अशा गोष्टींवर विश्वास बसत नाही. आपण सुशिक्षित आहोत आणि अशा गोष्टी शक्य नाहीत, असे वाटते. पण हे माझ्यासोबत घडले. तो बरोबर होता. माझ्यावर अजमेर शरीफचा आशीर्वाद आहे,’ असे शाहरुखने म्हटले होते.

दरम्यान, शाहरुखच्या आईचे १९९१ मध्ये निधन झाले. त्याच्या बॉलिवूड पदार्पणाच्या ‘दीवाना’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या अवघ्या वर्षभर आधी त्याने आईला गमावले. आईच्या निधनाचा शाहरुखच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. एका जुन्या मुलाखतीत शाहरुखने आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्याला मिळणारे यश आणि प्रसिद्धी आपल्या आईने पाहावी, अशी त्याची मनापासून इच्छा होती. ‘माझ्या आईने मला ७० एमएमच्या पडद्यावर, मी आता आहे त्यापेक्षा खूप मोठा पाहावं,’ अशी इच्छा त्याने व्यक्त केली होती. आज शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये मिळवलेल्या यशाकडे पाहता, त्याच्या संघर्षाच्या काळातील ‘५ हजार रुपये हरवले आणि ५०० कोटी कमावशील’ ही फकिराची भविष्यवाणी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.