11 रुपयांची सलाईनची नळी 325 रुपयांना, तुकाराम मुंढेंकडून खासगी रुग्णालयातील लूट उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी रुग्णालयांकडून उपचाराच्या नावाखाली सर्वसामान्य रुग्णांची केली जाणारी अवाढव्य आर्थिक लूट आता अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाहणीत उघड झाली आहे. केवळ ११ रुपये ५ पैशांना मिळणारी सलाईनची नळी (आयव्ही सेट) रुग्णांच्या माथी तब्बल ३२५ रुपयांना मारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, ही नफेखोरी चक्क २,८४१ टक्क्यांपर्यंत सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून वैद्यकीय उपकरणांच्या ट्रेड मार्जिनवर तात्काळ कठोर नियमन आणि मर्यादा घालण्याची शिफारस केली आहे.

नेमकी कशी केली जातेय लूट?

एफडीएच्या तपासणीत उघड झालेली विविध उपकरणांची तफावत पुढीलप्रमाणे –

  • सलाईन सेट (IV Set): खरेदी किंमत अवघी ११ रुपये ५ पैसे, तर रुग्णांना विक्री ३२५ रुपयांना.
  • सिरिंज: खरेदी किंमत ६ रुपये ७५ पैसे, तर रुग्णांकडून ५७ रुपये २० पैसे उकळले जातात.
  • कॅथेटर: मूळ खरेदी किंमत २९ रुपये ४१ पैसे, तर विक्री तब्बल ३१० रुपयांना.

इतर उपकरणे: ऑक्सिजन मास्क, नेब्युलायझर यांसारख्या अत्यावश्यक साहित्यांच्या किमतींमध्येही हजारो टक्क्यांची प्रचंड तफावत आढळून आली आहे.

माहितीचा अभाव अन् नियमांमधील पळवाट

रुग्णालयातील एकूण बिलापैकी सर्वाधिक महागडा भाग हा वैद्यकीय साहित्याचा असतो, ज्याचा उपचारांच्या थेट शुल्काशी संबंध नसतो. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला कोणत्याही उपकरणाची मूळ किंमत काय आहे किंवा त्यावर किती नफा लावला जातो, हे जाणून घेण्याचा अधिकारच उरलेला नाही.

‘औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३’ (DPCO) अंतर्गत अत्यावश्यक औषधांच्या किमतींवर मर्यादा आहेत. मात्र बहुतेक वैद्यकीय उपकरणे या नियमावलीच्या कक्षेबाहेर आहेत. याच पळवाटेचा गैरफायदा घेऊन उत्पादक आणि वितरक अनियंत्रितपणे छापील किमती निश्चित करतात आणि त्याचा थेट फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत असल्याचे समोर आले आहे.