
सोशल मीडियावर ब्युटी रुटीनचे अनेक ट्रेंड पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे आईस फेशियल. चेहऱ्यावर बर्फाचा वापर करून त्वचेला थंडावा देण्याची ही पद्धत अनेकांच्या ब्युटी रुटीनचा भाग बनली आहे.
चेहऱ्यावर थंडावा दिल्याने त्वचेवरील सूज आणि लालसरपणा काही काळासाठी कमी दिसू शकतो. त्यामुळे चेहरा अधिक फ्रेश आणि तजेलदार दिसतो. विशेषतः झोप पूर्ण न झाल्याने किंवा थकव्यामुळे चेहरा सुजलेला वाटत असल्यास बर्फाचा थंडावा काही प्रमाणात आराम देऊ शकतो. आईस फेशियल करताना मात्र काळजी घेणे गरजेचे आहे. बर्फ थेट त्वचेवर बराच वेळ घासण्याऐवजी तो स्वच्छ कापडात गुंडाळून हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवता येतो. मुख्य म्हणजे त्वचेवर जास्त वेळ बर्फ ठेवणे हे हानिकारक असते.
चेहऱ्यावर बर्फ लावल्याने रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो निर्माण होतो.
चेहऱ्याला बर्फ लावण्यासाठी सकाळची वेळ ही अत्यंत योग्य मानली जाते. संवेदनशील त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. त्वचेवर जळजळ, लालसरपणा किंवा अन्य त्रास जाणवल्यास हा उपाय त्वरित थांबवावा. त्वचेचा आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
























































