
निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या नावासह निवडणूक चिन्हावर अंतरिम स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ‘आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस’, असे म्हणत राहुल गांधी यांनी या घटनांमध्ये समान पद्धत असल्याचा आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी फेसबुक पोस्टद्वारे या प्रकरणावर भाष्य केले. या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, प्रत्येक वेळी भाजप आणि निवडणूक आयोग एकत्र येऊन एखादा पक्ष फोडतात आणि त्यानंतर त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह हिरावून घेतले जाते. संपूर्ण पक्षच ‘चोरला’ जाऊ शकतो, तर लाखो हिंदुस्थानींची मतेही ‘चोरली’ जाणे आश्चर्यकारक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्ह गोठवले! निवडणूक आयोगाचा अंतरिम आदेश
‘मतांची चोरी, सरकारची चोरी आणि आता पक्षाची चोरी’ या गोष्टी लोकशाहीच्या ऱ्हासाची चिन्हे बनल्या आहेत, असा दावा राहुल गांधी यांनी केला. जनमताचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे. मात्र, जनतेचे निर्णय उलथवून टाकणाऱ्या शक्तींना निवडणूक आयोग सहकार्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या विषयावर पुढे बोलताना राहुल गांधी यांनी हा लढा केवळ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नसल्याचे म्हटले आहे. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका अपेक्षित असलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाचा आणि प्रत्येक मतदाराचा हा लढा असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार ममता बॅनर्जी यांच्या पक्षाबरोबरच ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गद्दार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. दोन्ही गटांना पर्यायी पक्षनाव आणि मुक्त निवडणूक चिन्हांसाठी पर्यायांची यादी सादर करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.

























































