मोदी-शहा हे शिंदे गटाचे पुढारी, त्यांना खुश करण्यासाठीच एकनाथ शिंदे गुजरातीत बोलले; संजय राऊत यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वडनगरच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात गुजरातीतून केली होती. त्यावरून मोदी-शहा हे शिंदे गटाचे पुढारी आहेत, त्यांना खुश करण्यासाठीच एकनाथ शिंदे गुजरातीतून बोलले असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला. तसेच शिंदेच्या पक्षाची घटनाच गुजरातील लिहिली आहे. एकनाथ शिंदे गुजराती शिकले आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, भारताचा निवडणूक आयोग गेल्या 10 ते 12 वर्षांपासून अमित शहांचा घरगडी म्हणून काम करतोय. त्याच दबावाखाली निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला न्याय नाही मिळाला आणि सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडूनही आम्हाला न्याय मिळाला नाही. मूळ राजकीय पक्षाचं अस्तित्व महत्वाचं असतं. तो प्रवाह चालू राहिला पाहिजे. सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश बागची यांनी टिप्पण्णी केली. हाच संविधानाच्या 10 व्या कलमाचा आत्मा आहे. ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष आणि चिन्ह फुटीर गटाला देण्यात आला, हा या शतकातला सर्वात मोठा निवडणूक घोटाळा आहे. आणि तो दबावाखाली आणि आर्थिक प्रलोभनातून देण्यात आला. पण हळूहळू या सगळ्या गोष्टी न्यायालयाच्या चव्हाट्यावर येत आहेत. आणि निदान या गोष्टी लोकांना कळत आहेत की सहा वर्षांपूर्वी या देशात काय घडलं. त्यामुळे भविष्यात या गोष्टी आणखीन नव्या पद्धतीने पुढे येतील. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह फुटीर गटाला देणं हा शेकडो कोटींचा घोटाळा होता. आधीचे आणि आताचेही निवडणूक आयुक्त हे अमित शहांच्या घरगड्याप्रमाणेच वागले आणि वागतील, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तृणमूल काँग्रेस हा मूळ पक्ष ममता बॅनर्जी यांचा आहे. ममता बॅनर्जी यांनी या पक्षाची स्थापना केली आणि त्यांनीच या पक्षाची ध्येय धोरणं ठरवली. फुटलेले आमदार-खासदारांना ममता बॅनर्जी यांनीच उमेदवारी दिली होती. पण अमित शहांनी पक्ष फोडला. 40-45 आमदार बाजूला गेले, 22 खासदारांना बाजूला केलं. त्यामुळे फुटीर गटाचा पक्ष होईल का? हा पक्ष ममता बॅनर्जींचा असायला पाहिजे. खरंतर चिन्हावरही बंदी असता कामा नये. फुटलेल्या आमदार खासदारांनी दुसरं चिन्ह घ्यावं आणि लढावं. काल न्यायमुर्ती यांनी जे शिवसेनेच्या बाबतीत सांगितलं की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ते निवडणूक का लढले? त्यांनी दुसरं चिन्ह देऊन ताकद दाखवायला पाहिजे होती. हे न्यायालयाने म्हणचले आहे. हीच बाब ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या पक्षाला लागू होते. मूळ पक्षाचे निर्माते, प्रबंधक हयात आहेत. तरीही निवडणूक आयोग अन्याय पद्धतीने दबावाखाली प्रलोभनाला बळी पडून अशा पद्धतीने बेफाम निर्णय देत असेल तर या देशातली लोकशाही संकटात आणि धोक्यात आहे. मोदींच्या वाढदिवसाला दिवे लावून लोकशाही वाचणार नाही किंवा लोकशाहीचे तेज उजळणार नाही. ज्या पद्धतीने आम्ही आमची बाजू मांडली, ज्या पद्धतीने आम्ही घटनेतल्या दहाव्या कलमाची व्याख्या केलेली आहे. आणि 10 व्या कलमावर निवडणूक आयोग आणि तेव्हाचे सर्वोच्च न्यायालय जी चुकीची भूमिका घेऊन फुटीर गटाला जी मान्यता दिली त्याच्यावर आमची लढाई आहे. पक्षाचं चिन्ह गोठवायला नाही पाहिजे होतं, मूळ पक्ष आजही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. त्यांनी आम्हालाच चोर ठरवलं. चोर चोरी करून गेला आणि ज्याच्या घरात चोरी झाली त्यालाच फौजदाराने चोर ठरवलं आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी यांच्याबाबतीतही तेच झालं. हा कोणता न्याय देशात सुरू आहे? पाच वर्ष आम्ही अन्याय सहन केला. यावेळी आम्ही आशावादी आहोत. आणि न्याय होईल एवढंच मी सांगू शकतो, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे शिंदेंच्या पक्षाचे नेते आहेत. शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. शिंदे गटाचं मुख्यालय गुजरातमध्ये आहे. आणि त्यांच्या पक्षाचे पुढारी गुजराती आहेत. त्यामुळे आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी शिंदे गुजरातीत बोलले असतील. अमित शहांना उत्तम मराठी येतं, त्यांच्या पत्नी मराठी आहेत. नरेंद्र मोदींना एकनाथ शिंदेंपेक्षा चांगलं मराठी येतं. गुजराती, हिंदी किंवा उर्दू बोलणं हा काही गुन्हा नाही. पण शिंदेच्या पक्षाची घटनाच गुजरातील लिहिली आहे. एकनाथ शिंदे गुजराती शिकले आहेत. मराठी बोलल्यावर नेतृत्व उजळत नसेल असं जर त्यांना वाटत असेल तर हा छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. वसंतदादा पाटील यांना हिंदी येत नव्हतं ते दिल्लीत मराठीत बोलायचे. यशवंतराव चव्हाण गुजरातीत बोलत नव्हते. पण शिंदे यांचा पक्षच गुजराती आहे, ते सूरतमध्ये शिवसेना भवन बांधत आहेत असं कळालं मला. पण तोवर शिवसेना त्यांच्या हातात राहणार नाही, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

तृणमूल काँग्रेसने भारतीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ममता बॅनर्जी यांनी हा पक्ष स्थापन केला आणि आपल्या मेहनतीवर पक्ष पुढे नेला. शिवसेना जशी बाळासाहेब ठाकरे यांची आहे तशीच तृणमूल काँग्रेस हा पक्ष ममता बॅनर्जी यांचाच आहे. पण अमित शहा आमदार खासदार विकत घेतात आणि पक्ष फोडतात. निवडणूक आयोगावर दबाव टाकतात, सुप्रीम कोर्ट मॅनेज केलं जातं. आणि मूळ पक्ष फोडून जे फुटलेले लोक आहेत त्यापैकी एकाला हा पक्ष सोपवतात. मूळ पक्षाचे अस्तित्व असले पाहिजे असं संविधानाचं 10 वं कलम सांगतं. तृणमूल काँग्रेसचं निवडणूक चिन्ह गोठवण्याची गरज नव्हती. शिवसेनेच्या बाबतीत पक्ष आणि चिन्ह दुसऱ्यालाच देऊन टाकलं, असेही संजय राऊत यांनी यावेळी नमूद केले.