
बनावट ओळखपत्राद्वारे सिमकार्ड खरेदी किंवा विक्री केल्यास अथवा मोबाईलच्या आयएमईआय क्रमांकात छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला 50 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळे ज्याच्या नावावर हे सिम कार्ड असेल त्या व्यक्तीला या भल्यामोठ्या दंडासह 3 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, असे दूरसंचार विभागाच्या नव्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे. त्यामुळे स्वतःच्या नावावर असलेले सिमकार्ड कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका, असे आवाहन दूरसंचार विभागाकडून करण्यात आले आहे.
सरकारने नागरिकांच्या ओळखपत्रावर त्यांच्या माहितीशिवाय कोणताही अनोळखी मोबाइल क्रमांक सक्रिय तर नाही ना, हे एकदा तपासून घेण्याची गरज आहे. त्यासाठी सर्व नागरिकांना संचार साथी पोर्टल किंवा अॅपवर जाऊन त्वरित तपासणी करण्याचा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे. दूरसंचार विभागाने छत्तीसगडमध्ये झालेल्या एका मोठ्या सायबर फसवणुकीनंतर हे पाऊल उचलले आहे. एका सिम विक्री करणाऱ्या एजंटने लोकांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून 25 बनावट सिम कार्यान्वित केले होते. ज्या फोनच्या आयएमईआय क्रमांकात छेडछाड किंवा बदल करण्यात आला असेल, त्याचा वापर करणे बेकायदेशीर आहे. अॅप्स किंवा वेबसाइट्सद्वारे दुसऱ्या व्यक्तीचा क्रमांक दाखवून कॉल करणे, कॉलिंग आयडी बदलणे अशा साधनांचा वापर करणेही गुन्हा आहे. सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास सांगितले आहे.
असे तपासा सिमकार्ड
sancharsaathi.gov.in या वेबसाईटवर सर्वात आधी जा. होमपेजवर know your mobile connections वर क्लिक करा. लॉगिन केल्यानंतर मोबाइल नंबर टाका, त्यानंतर ओटीपी सबमिट करा. लॉगिन झाल्यावर स्क्रीनवर सर्व सक्रिय मोबाइल नंबर दिसतील. जर यादीत तुमच्या नावावर एखादा नंबर दिसल्यास त्याला निवडून not my number किंवा report वर क्लिक करा. त्यानंतर त्या नंबरला ब्लॉक केले जाईल.

























































