मुंबई महापालिकेत ‘ऑनलाइन’ बदल्यांचा खेळ! 20 सप्टेंबरपर्यंत 836 इच्छुकांचे अर्ज, बदल्या रोखण्यासाठी जोरदार लॉबिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेत अभियंत्यांच्या ‘ऑनलाइन’ बदल्यांचा खेळ सुरू झाला आहे. बदली प्रक्रियेत पारदर्शकता यावी म्हणून पालिका प्रशासनाने ऑनलाइन बदली प्रणाली आणली आहे. या प्रणालीमध्ये 20 सप्टेंबरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात तब्बल 836 अभियंत्यांनी अर्ज केले आहेत, तर तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेले 1,600 हून अधिक अभियंते बदलीसाठी पात्र असल्याचे आढळून आले आहे. अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन बदली प्रक्रिया मोठी कसोटी ठरणार आहे.

अभियंत्यांच्या बदल्यांमध्ये ‘कॅश फॉर ट्रान्सफर’चा आरोप झाल्यानंतर पालिका प्रशासनाने ही ऑनलाइन बदली प्रणाली आणली. याअंतर्गत बदलीसाठी इच्छुक अभियंत्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. नव्या प्रणालीत पात्र कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांना एक ते पाच पसंतीची ठिकाणे निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. रिक्त पदे, कर्मचाऱ्यांची पसंती, विभागाची गरज आणि मनुष्यबळाचे नियोजन यांचा संगणकीय पद्धतीने मेळ घालून पोस्टिंग देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. रँडमायझेशनच्या माध्यमातून निर्णय घेऊन ‘सेटिंग’ आणि मानवी हस्तक्षेपाला लगाम घालण्याचा दावा केला जात आहे. त्यासाठी तीन उपायुक्तांची समिती गठीत करण्यात आली आहे.

पुढच्या महिन्यात सोडत

पहिल्या टप्प्यातील बदली प्रक्रिया 20 ऑक्टोबर 2026 च्या आत पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्याआधी 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान संगणकीय सोडत काढली जाणार आहे, मात्र बदल्यांची प्रक्रिया पुढे जावी म्हणून मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे. पाणी खात्यातून एकाच वेळी 100 ते 200 जणांच्या बदल्या रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मात्र पालिका प्रशासन बदल्यांच्या प्रक्रियेवर ठाम आहे. नियमानुसार, एकूण पात्र अभियंत्यापैकी 25 टक्के अभियंत्यांच्या बदल्या केल्या जातील. त्यातही जे अधिकारी 15-15 वर्षे एका जागेवर आहेत, त्यांची प्राधान्याने बदली केली जाणार आहे. केवळ अभियंत्यांच्या पसंतीनुसार बदली न करता महापालिकेच्या प्रत्यक्ष विभागीय गरजा आणि रिक्त पदांचा ताळमेळ साधावा लागणार आहे.