
यंदाच्या अनंत चतुर्दशीला गिरणगावातील आर्थर रोड नाक्यावर भगवान विष्णूंचा तिसरा ‘श्री वराह अवतार’ प्रकटणार आहे. या भव्यदिव्य देखाव्याच्या मदतीने गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. हनुमान उत्सव मंडळाने हा देखावा साकारला आहे.
हनुमान उत्सव मंडळाचे पंढरीनाथ बानकर आणि त्यांच्या मित्रपरिवाराने विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी आणि भक्तांना मोफत थंड पाणी देण्याचा उपक्रम सुरू केला. सुरुवातीला लाकडी टोपल्यांना रंगीबेरंगी कागद लावून फुले उधळली जायची, पण नंतरच्या काळात तरुणांनी कल्पकता वापरून अध्यात्मिक, वैज्ञानिक आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेले आकर्षक देखावे उभारण्यास सुरुवात केली. आतापर्यंत पुष्पक विमान, श्री पांडुरंग, अशोक स्तंभ, भारत माता, अंतराळ यान, पृथ्वी, भगवान शंकर, मोदक, अष्टविनायक आणि कथकली मुखवटा असे अनेक कलात्मक देखावे येथे सादर करण्यात आले आहेत.
मंडळाचे बाबू नाईक, विक्की पडाया, सनी जाधव, अजित हळदणकर आणि गिरीधर नाईक यांच्या संकल्पनेतून ‘श्री वराह अवतार’ हा देखावा साकारला आहे. हे मंडळ वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवतात, अशी माहिती कार्यकर्ते चंदन विचारे यांनी दिली. सर्व गणेशभक्तांनी या पुष्पवृष्टी सोहळय़ाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र चिंदरकर, खजिनदार संजय परब आणि सचिव मिलिंद पावसकर यांनी केले आहे.




























































