
उत्तर प्रदेशातील आजमगड जिल्ह्यात एका घरात सुरू असलेल्या पूजेदरम्यान एका व्यक्तीने त्याची पत्नी, मुलगा व दोन पुजाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली. यानंतर त्याने आपल्या तीन मुलींना घरात ओलीस ठेवले होते. त्या मुलींची सुटका करण्यासाठी पोलिसांनी बरेच प्रयत्न केले. मात्र अखेर पोलिसांनी आरोपीला आठ तासांच्या थरारक कारवाईनंतर चकमकीत ठार केले. अरविंद सिंह असे या आरोपीचे नाव आहे.
ही धक्कादायक घटना आजमगडमधील शंभुपूर गावात मंगळवारी रात्री घडली. आरोपी अरविंद सिंह याच्या भावाचे नुकतेच निधन झाले होते. त्यानिमित्ताने घरात एका पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजा सुरू असताना अरविंद सिंह घरी पोहोचला आणि त्याने तिथे वाद घालायला सुरुवात केली. रागाच्या भरात अरविंदने आपल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात त्याची पत्नी बबिता आणि पूजा सांगायला आलेले दोन पुजारी जागीच ठार झाले. तर इतर दोन पुजाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तिथून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले.
८ तासांचा थरार आणि पोलिसांची कारवाई
घटनेनंतर आरोपी अरविंदने आपल्या तीन मुलांसह स्वतःला घरात कोंडून घेतले. माहिती मिळताच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. आजमगडचे एसएसपी अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपीच्या कुटुंबीयांच्या मदतीने त्याला आत्मसमर्पण करण्याचे आणि मुलांना सोडण्याचे वारंवार आवाहन केले. मात्र, अरविंदने पोलिसांवर आणि कुटुंबीयांवरही गोळ्या झाडण्याची धमकी देत मुलांना सोडण्यास नकार दिला. हा संघर्ष तब्बल आठ तास सुरू होता. अचानक घरातून गोळी झाडल्याचा आवाज आला. अरविंदने आपल्याच १० वर्षांच्या मुलावर गोळी झाडली होती. यात त्या मुलाचा देखील मृत्यू झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी मुलांना वाचवण्यासाठी तात्काळ कारवाई सुरू केली. घरात अश्रुधूर आणि स्टन ग्रेनेडचा वापर करून पोलीस आत शिरले.
यादरम्यान अरविंदने पोलिसांवर आपल्या रिव्हॉल्व्हरमधून सर्वच्या सर्व ६ गोळ्या झाडल्या. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ आणि मुलांच्या बचावासाठी केलेल्या प्रत्युत्तराच्या गोळीबारात अरविंद गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गोळीबारात जखमी झालेल्या १० वर्षांच्या मुलालाही उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
पोलिसांनी घरातून दोन मुलींची सुखरूप सुटका करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मृत पत्नी आणि दोन पुजाऱ्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

























































