रायगडावरील रोप वे 15 नोव्हेंबरपर्यंत बंद; देखभाल, दुरुस्तीचे काम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हजारो शिवभक्तांसह पर्यटकांना किल्ले रायगडावर घेऊन पर्यटकांना घेऊन जाणारा रोप वे १५ नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी २१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत रोप वे बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे किल्ल्यावर जाणाऱ्या शिवभक्तांची मोठी गैरसोय होणार असून पुढील २५ दिवस पायरी मार्ग गडावर जावे लागणार आहे. देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर रोप वे १६ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

रायगड किल्ल्यावर दररोज हजारो पर्यटक येतात. यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेता यावे यासाठी गडाच्या पायथ्याशी जोग कंपनीने रोप वे उभारला आहे. यामुळे रायगडावर अवघ्या दोन ते तीन मिनिटांत पोहोचणे शक्य होते. मात्र रोप वेने गडावर जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दर सहा महिन्यांनी या रोप वेची देखभाल, दुरुस्ती केली जाते. २१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान रायगड रोप वेची सेवा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. १६ नोव्हेंबरपासून रोप वे सेवा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. मात्र देखभाल, दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणीची कामे पूर्ण झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्याबाबत अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रोप वेच्या सुरक्षित आणि सुरळीत संचालनाच्या दृष्टीने दरवर्षी हंगामपूर्व देखभाल आणि तांत्रिक तपासणी केली जाते. याच अनुषंगाने यंदाही रोप वेच्या विविध यंत्रणा, तांत्रिक बाबी आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करण्यात येत आहे.

देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्ण करण्याबरोबरच आवश्यक सुरक्षा तपासण्या करण्यात येणार आहेत. रोप वे सेवा बंद राहणार असल्याने रायगडावर येणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या गैरसोयीबद्दल रायगड रोप वे प्रशासनाच्या वतीने राजेंद्र खातू यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.