माथेरान घाटात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली; टॉय ट्रेन बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली, कड्यावरचा गणपती मार्ग ठप्प, रूळ ढिगाऱ्याखाली दबले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परतीच्या पावसाने आज माथेरानच्या घाटात नोठी दरड कोसळली. कड्यावरच्या गणपती मार्गावर ही दरड कोसळली असून येथील रेल्वे ट्रॅक मातीखाली गाडले गेले आहेत. दरम्यान पावसाळ्यात या मार्गावरून धावणारी टॉय ट्रेन बंद असल्याने मोठा अपघात टळला आहे.

नेरळ येथे राहणारे कमलेश ठक्कर हे आपल्या साथीदारासह कड्यावरच्या गणपतीचे दर्शनासाठी निघाले. टॉय ट्रेन बंद असल्यामुळे त्यांना रेल्वे रुळांवरून जाण्याचे ठरवले. अर्ध्यावर पोहोचल्यानंतर मोठमोठ्या दगडांसह मातीचा मलबा रेल्वे रुळावर कोसळल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी याची माहिती नशासनाला दिली. दरड कोसळल्यामुळे कड्यावरच्या गणपतीकडे जाण्याचा मार्ग बंद झाला होता. एका बाजूला दरड तर दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने अनेक पर्यटकांना अर्ध्यावरून पुन्हा परतावे लागले. यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाली.

सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

नेरळ-माथेरान हा सुमारे २१ किलोमीटरचा वळणावळणाचा घाटमार्ग असून या मार्गावर उंच डोंगर, तीव्र चढ-उतार आणि खोल दऱ्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. यातच रुळावर मातीच्या मलब्यासह भलेमोठे दगड कोसळल्याने रेल्वे नशासनासमोर मार्ग सुरक्षित करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सध्या मान्सूनमुळे नेरळ-नाथेरान टॉय ट्रेन सेवा बंद असल्याने या घटनेच्या वेळी प्रवासी रेल्वे या मार्गावर नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. दसऱ्याच्या मुहूर्तावर नेरळ-माथेरान टॉय ट्रेन सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता असताना घाटात दरड कोसळ्याने मार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

  • माथेरानमधील पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते. गर्दीच्या वेळी दरड कोसळली असती तर मोठा अनर्थ झाला असता.
  • माथेरानच्या घाटरस्त्यामध्ये दरवर्षी पावसाळ्यात लहान, मोठ्या दरडी कोसळत असतात. येथील देखभाल व दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे.