
राज्यभरातील महाविद्यालयीन विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी, पाच दशकांची समृद्ध परंपरा असलेली नी. गो. पंडितराव वक्तृत्व स्पर्धा यंदा ३ आणि ४ ऑक्टोबरला ठाण्यात होणार आहे. स्पर्धेचे यंदाचे ५८वे वर्ष असून स्पर्धेत नियोजित आणि आयत्या वेळच्या विषयावर भाषणाची संधी मिळणार आहे. दोन्ही गटांसाठी एकूण ४४ हजार रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाण्यातील श्री समर्थ सेवक मंडळ या संस्थेतर्फे नी. गो. पंडितराव या बहुआयामी शिक्षकाच्या स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी महाविद्यालय अशा दोन गटांसाठी होणार आहे. नियोजित विषय (८ मिनिटे) आणि आयत्या वेळचा विषय (३ मिनिटे) अशा दोन भागांत ही स्पर्धा होते. पदवी गटासाठी नियोजित वक्तृत्वाकरिता फुटणारे पेपर आणि विद्यार्थी आंदोल न, मक्का संरक्षण कराराचे हिंदुस्थानवरील संभाव्य परिणाम, मराठी शाळा बंद पडत आहेत, आशा भोसल व सुमन कल्याणपूर – मलमली स्वरांचे चांदणे, विकासाची हाव आणि पर्यावरणावर घाव हे विषय आहेत तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उदय – एक नवीन आव्हान, आजची सामाजिक स्थिती व अंधश्रध्दा निर्मूलनाची वाढती गरज, शैक्षणिक जीवनातील प्रतिष्ठीत वक्तृत्व स्पर्धा बंद पडत आहेत, माझा आवडता निसर्ग कवी, वाढते शहरीकरण – विकास की विनाश? असे विषय आहेत.
गडकरी रंगायतनसमोरील शिवदौलत सभागृह येथे ही स्पर्धा दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होईल. तर पारितोषिक वितरण समारंभ ४ ऑक्टोबरला संध्यकाळी होणार आहे. ठाणे आणि मुंबईबाहेरच्या स्पर्धकांना विनामूल्य निवास व्यवस्था आणि प्रवास खर्च देण्यात येईल, अशी माहिती स्पर्धा समितीचे चिटणीस योगेश भालेराव यांनी दिली. स्पर्धेविषयी अधिक माहिती व अर्जासाठी ९९८७९०६२०६, ९८२१५७२४२७, ८८७९६३०६२४ येथे संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.




























































