
सूर्यमाळ ग्रामपंचायत हद्दीतील केवनाळे गावात बिबट्याचा वावर वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या घराजवळील गोठ्यात घुसून बिबट्याने दोन बकऱ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा फाडला. बिबट्याच्या दहशतीमुळे सायंकाळी सातनंतर ग्रामस्थ दारे-खिडक्या बंद करून स्वतःला अक्षरशः कोंडून घेत आहेत.
केवनाळे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. शेतकरी प्रकाश खाडे आणि पांडुरंग मिरिंदे यांच्या घराजवळील गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांचा फडशा पाडला. दोरखंड तोडून बकऱ्या पळवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केवनाळे परिसरात रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास येत होते. मात्र हा प्राणी बिबट्या आहे की अन्य कोणता वन्यप्राणी आहे याबाबत नागरिकांना संभ्रम होता. त्यामुळे वनविभागाकडे तक्रार करण्यात आली नव्हती. परंतु आठ ते दहा दिवसांत दोन घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.
तातडीने उपाययोजना करा
केवनाळे गाव वाडा वनपरिक्षेत्राच्या हद्दीत येत असल्याने या परिसराची जबाबदारी वाडा वन कर्मचाऱ्यांची असल्याचे सूर्यमाळ वनक्षेत्रपालांकडून सांगण्यात आले. वनविभागाने केवनाळे परिसराची पाहणी करून बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा तसेच त्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागरिक आणि पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशीही मागणी स्थानिकांनी केली आहे.




























































