ज्ञानेश कुमार हे निवडणुकीत घोटाळे करून विजय संपादन करण्याचे हत्यार; त्यांना वाचवणे मोदी-शहांचा आपद्धर्म, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेद समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोन्ही सह-आयुक्तांनी 10 महिन्यात 14 वेळा आक्षेप नोंदवले असून कॅबिनेट सचिवांकडेही तक्रार केली. यानंतर विरोधक आक्रमक झाले असून ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराविरोधात शिवसेना-मनसे 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत जनमोर्चा काढणार आहे. अशातच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी रविवारी एक्सवर पोस्ट करत ज्ञानेश कुमार यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला.

ज्ञानेश कुमार हे मोदी-शहा यांच्या गळ्यातील हाडुक बनले आहेत. ज्ञानेश कुमार निवडणुकीत घोटाळे करून विजय संपादन करण्याचे हत्यार आहेत. त्यामुळे या गुन्हेगाराला वाचवणे हा मोदी-शहांचा आपद्धर्म बनला आहे. .मोदी सरकार आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सर्व काम सोडून ज्ञानेश कुमार आणि त्याच्या गुन्ह्यांचे रक्षण करण्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्याचे आदेश दिले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

ज्ञानेश कुमार हटाव; शिवसेना-मनसेचा 4 ऑक्टोबरला मुंबईत जनमोर्चा, उद्धव ठाकरे – राज ठाकरे यांचे नेतृत्व

मोदी सरकार आणि त्यांच्या नियंत्रणाखालील राज्यांच्या संपूर्ण पोलीस यंत्रणा त्याच्याविरुद्ध निदर्शने रोखण्यासाठी तैनात करण्यात आली आहे! केंद्रीय शशस्त्र बल सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहे. कदाचित सैन्याचा वापर होईल. लोकशीच्या खुन्यांना वाचवण्यासाठी काय हा खटाटोप. मोदी सरकारचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे ज्ञानेश कुमारला वाचवा! पण मी खात्रीने सांगतो, ज्ञानेश कुमारला जावे लागेल, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.