मातंग समाजाची मुंबईत धडक, आरक्षण उपवर्गीकरणासाठी फोर्ट परिसरात चक्का जाम; आंदोलकांची धरपकड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या (अ, ब, क, ड) मागणीकडे महायुती सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ मातंग समाजाने मंगळवारी मुंबईत धडक दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोरील रस्त्यावर मातंग समाजाच्या हजारो आंदोलकांनी भररस्त्यावर ठिय्या मांडला. पोलिसांना गाफील ठेवून आंदोलकांनी रस्त्यावर ‘चक्का जाम’ केल्यामुळे संपूर्ण दिवसभर दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्णपणे कोलमडली. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. मात्र त्यानंतरही आक्रमक भूमिका कायम ठेवत आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला.

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीवर महायुती सरकार निष्क्रिय राहिल्याने मातंग समाजाचा असंतोष उफाळून आला आणि राज्यभरातून हजारो लोक मुंबईत धडकले. सकल मातंग समाजाच्या वतीने आझाद मैदानात हे आंदोलन केले जाणार होते. मात्र आंदोलकांनी थेट रस्त्यातच बसून उपवर्गीकरणाचा शासन निर्णय (जीआर) जारी होईपर्यंत मुंबई सोडणार नसल्याचा इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत निकाल दिला होता.

आंदोलक बेस्ट बस आणि झाडावर चढले

पोलिसांनी धरपकड सुरू करताच काही आंदोलक आझाद मैदानाला लागून असलेल्या झाडावर चढले, काहीजण रस्त्यावर झोपले, तर काही आंदोलकांनी बेस्टच्या बसगाडय़ांवर चढून सरकारच्या निक्रिय भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. झाडावर चढलेल्या आंदोलकांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया नेत्यांनी त्यांना खाली उतरण्यासाठी विनवणी केली, मात्र ते मागणीच्या पूर्ततेसाठी तासन्तास झाडावरच राहिले.

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

आंदोलन चिघळण्याच्या शक्यतेने संपूर्ण परिसरात मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकांची गर्दी थेट सीएसएमटी स्थानकापर्यंत पोहोचली होती, तर पालिकेशेजारील रस्ता संपूर्णपणे आंदोलकांमुळे व्यापला होता. संभाव्य परिस्थिती लक्षात घेत पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांनी मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच स्थानबद्ध केले. आंदोलनात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, सत्ताधारी भाजपचे नेतेही सरकारविरोधात उभे ठाकले होते.