
भाजपने भगवान प्रभू श्रीरामांना आपल्या राजकीय फायद्यासाठी चोरले आहे, असा गंभीर आरोप तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केला आहे. आम्ही द्रविड आहोत. तर उत्तर भारतातील लोक हे आर्य आहेत. आम्ही शिवाचे भक्त आहोत आणि आर्य हे भगवान रामांचे भक्त आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिव हे गरीबांचे तर राम हे श्रीमंताचे देव आहेत. तसेच भाजप हा श्रीमंतांचा पक्ष आहे, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले. रेड्डी यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. रेवंत रेड्डी यांनी भगवान राम आणि भगवान शिव यांना उत्तर आणि दक्षिण अशा भागांत विभागू नये, असे केंद्रीय राज्यमंत्री बंदी संजय कुमार यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांना अधिक चांगले माहीत असायला हवे. तेलंगणात वेमुलवाडा येथे दक्षिण काशी आणि भद्राचलम येथे दक्षिण अयोध्या आहे, असे म्हटले आहवे.
एसआयआरविरोधात आंदोलन
एसआयआरविरोधात तेलंगणात आंदोलन केले जाईल. देशभरात ‘सायमन गो बॅक’ आंदोलनाप्रमाणे निषेध केला जाईल. एसआयआरचा उद्देश मतदारांची नावे हटवून भाजपला फायदा पोहोचवून देणे हा आहे. केंद्र सरकारमधील संरक्षण, गृह आणि वाणिज्य यांसारखी महत्त्वाची खाती उत्तर भारतातील नेत्यांकडे असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित केला.




























































