
देशाचे भ्रष्ट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शिवसेना-मनसेने आज रणशिंग फुंकले. निवडणूक घोटाळे करून कोटय़वधी मतदारांचा अपमान करणाऱ्या ज्ञानेश कुमारांना हटवण्याच्या मागणीसाठी दोन्ही पक्षांनी संयुक्त महामोर्चाची घोषणा केली. मुंबईत रविवार, 4 ऑक्टोबर रोजी हा महामोर्चा निघणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. मोर्चासाठी सर्वपक्षीयांना निमंत्रण दिले जाणार असून तिरंगा हा एकच झेंडा मोर्चात दिसणार आहे.
राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी आज उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, आमदार अनिल परब, मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर हे यावेळी उपस्थित होते. ठाकरे बंधूंनी पत्रकारांना संयुक्त महामोर्चाविषयी सविस्तर माहिती दिली.
भायखळा येथील रिचर्डसन ऍण्ड क्रूडास कंपनीच्या प्रवेशद्वारापासून सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होईल. हा मोर्चा मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापर्यंत जाईल. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे या मोर्चाला संबोधित करणार आहेत.
लोकशाहीसाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा – उद्धव ठाकरे
‘लोकशाही वाचवण्यासाठी जे-जे पक्ष आणि संघटना आंदोलन करतील त्यांना आमची पूर्ण साथ राहील,’ अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधातील आंदोलनावर बोलताना मांडली.
निवडणूक आयोग व ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सध्या देशभर विविध आंदोलने सुरू आहेत. कॉक्रोच जनता पार्टी 2
ऑक्टोबरला मुंबईत आंदोलन करणार आहे. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट उत्तर दिले. ‘कॉक्रोच जनता पक्षाच्या 2 तारखेच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. यापूर्वी त्यांनी जंतर मंतरवर केलेल्या आंदोलनालाही आम्ही पाठिंबा दिला होता याकडे त्यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.
हा मोर्चा लोकशाही आणि संविधानासाठी – राज ठाकरे
शिवसेना-मनसेचा हा महामोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही. निवडणूक आयोगाच्या गेल्या काही वर्षांतील कारभाराच्या विरोधातील हा मोर्चा आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा विषय आहे. यात कुठल्याही राजकीय पक्षाचे झेंडे नसतील. सर्वांच्या हातात फक्त तिरंगा असेल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
‘निवडणूक प्रक्रियेच्या संदर्भातील आमच्या तक्रारी नव्या नाहीत. गेली अनेक वर्षे आम्ही त्यावर बोलत आहोत. मी स्वतः अनेकांना भेटून ईव्हीएम मशीनविषयी भूमिका मांडली होती. रविवारच्या मोर्चाच्या निमित्ताने पुन्हा त्यावर बोलणार आहोत, असे ते म्हणाले.
आयोगावर बोललो तर भाजपला त्रास का होतो?
विरोधक आपल्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. याविषयी विचारले असता, ‘खाई त्याला खवखवे’ असा टोला राज ठाकरे यांनी हाणला. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतोय तर भाजपला त्रास होण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.
इंडिया आघाडीची आज बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार यांची ऑनलाईन उपस्थिती
निवडणूक आयोगाचा घोटाळा चव्हाट्यावर आल्याच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीतील पक्षांची बैठक बुधवारी दिल्लीतील कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उद्याच्या बैठकीत ज्ञानेश कुमारांच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होईल. त्यानंतर देशपातळीवर काय करायचे याचा निर्णय होईल.’
काँग्रेसने काल देशभरात आंदोलन केले ही चांगली गोष्ट आहे. 2 तारखेला कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करेल. 4 तारखेला आम्ही आंदोलन करू. प्रत्येकाने आपापल्या परीने जनतेला जागे केले पाहिजे. गरज वाटल्यास शेवटी एकत्रित मिळून भीमटोला मारू. – उद्धव ठाकरे
एकापेक्षा जास्त मोर्चे निघत असतील तर चांगली गोष्ट आहे. अजेंडा एकच आहे, तो कोणी कसाही राबवावा. ज्यांना-ज्यांना जे-जे शक्य होईल ते-ते त्यांनी करावं. हा स्पर्धेचा विषय नाही. एखाद्या हाउसिंग सोसायटीला आंदोलन करावंसं वाटलं तर तेही करू शकतात. – राज ठाकरे
- ‘संयुक्त मोर्चासाठी आम्ही सर्वच पक्षांच्या नेत्यांना आमंत्रण देणार आहोत. फोन करून प्रत्येकाशी चर्चा करणार आहोत. अगदी सत्ताधारी पक्षाच्या लोकांनाही मोर्चाच्या व्यासपीठावर येण्याची मुभा असेल,’ असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.




























































