
एमपीएससी परीक्षा सुधारणासाठी स्थापन केलेल्या टास्क पर्ह्सने आतापर्यंत पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आतापर्यंत सुमारे 1500 विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. भरती परीक्षा सुधारण्यासाठी सुमारे 30 हजार सूचनांचे ई–मेल आले आहेत. आजच्या दिवशी 200 उमेदवारांनी आपले म्हणणे समितीसमोर मांडल्याची माहिती टास्क फोर्सच्या अध्यक्ष तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
एमपीएससी परीक्षा प्रक्रिया सुधारण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने कोकण विभागातील उमेदवारांशी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात संवाद साधला.
त्यानंतर माध्यमांशी बोलताना व्ही. राधा म्हणाल्या, उच्चस्तरीय समितीने आतापर्यंत पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थी व उमेदवारांशी संवाद साधला आहे. येत्या बुधवारी नाशिक विभागात संवाद साधणार आहे. प्रत्येक विभागात वेगळे प्रश्न मांडण्यात आले. प्रत्येक प्रश्न, मुद्दय़ाचा सखोल अभ्यास करूनच अहवाल शासनास सादर केला जाईल.
एमपीएससी परीक्षा प्रक्रिया सुधारणा हा विषय राज्य शासनाने अतिशय गांभीर्याने घेतला आहे. हा विषय अतिशय संवेदनशील असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांनी मांडलेल्या सूचनांचा टास्क फोर्सकडून सकारात्मक विचार केला जाईल, तसेच परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर केला जाईल, असे व्ही. राधा यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रक्रियेतून टास्क पर्ह्सला मोठय़ा प्रमाणात माहिती मिळाली. संवादातूनही विविध प्रकारचे प्रश्न समोर आले असून अहवाल तयार करताना याचा निश्चितच उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांनी विविध विभागांच्या परीक्षांशी संबंधित स्वतंत्र समस्याही मांडल्या आहेत. त्यामुळे परीक्षानिहाय आणि विभागनिहाय प्रश्नांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासोबतच केंद्रीय लोकसेवा आयोग, इतर राज्यांतील भरती प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून आलेल्या सूचना आणि संवादातून मिळालेल्या अनुभवांच्या आधारे भरती परीक्षा प्रक्रिया अधिक प्रभावी, आदर्श करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात येणार असल्याचे राधा यांनी सांगितले.
कोकण विभागातून या सूचना आल्या
कोकण विभागातील विद्यार्थ्यांकडून अनेक सूचना आल्या. भरती परीक्षा प्रक्रियेतील दिरंगाई टाळावी, परीक्षा पारदर्शक व्हावी, परीक्षा पॅटर्न बदलाबाबत पूर्वकल्पना मिळावी, गट ‘क’ची सर्व पदांची भरती एकत्र व्हावी, दोन पदांच्या परीक्षेत अंतर असावे, प्रलंबित परीक्षा लवकर व्हाव्यात, पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा असे दोन भाग असावेत, वरिष्ठ पदानुसार निकाल जाहीर करावा. एक पद एक परीक्षा असावी, प्रतीक्षा यादीवरील विद्यार्थ्यांचा विचार व्हावा, वर्णनात्मक प्रश्नपत्रिका असावी, एकदाच नोंदणी व शुल्क आकारणी करावी, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, उत्तरतालिका आणि पेपर तपासणी अधिक पारदर्शक असावी, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलींना वयामध्ये सूट असावी अशा विविध सूचना करण्यात आल्या.

























































