कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा पेणजवळ चार तास खोळंबा ,‘जनशताब्दी’मधील बिघाडाचा वाहतुकीवर परिणाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईहून मडगावच्या दिशेने चाललेल्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मंगळवारी सकाळी कोकण रेल्वेची वाहतूक कोलमडून प्रवाशांचे अतोनात हाल झाले. पेण स्थानकाजवळ सकाळी सातच्या सुमारास एक्सप्रेसमध्ये बिघाड झाला. नंतर दहाच्या सुमारास गाडीला नवीन इंजिन लावण्यात आले, परंतु पुन्हा तांत्रिक अडचण आली. या गोंधळात प्रवासी तब्बल चार तास एकाच ठिकाणी लटकले. अखेर 11 च्या सुमारास बिघाड दुरुस्त करून गाडी मार्गस्थ झाली.

पेण आणि जिते स्थानकांदरम्यान जनशताब्दी एक्सप्रेसच्या प्रेशर पाईपमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एक्सप्रेस सकाळी 7.14 वाजता गाडी मधेच अडकली. दुरुस्तीनंतर ती गाडी अधिक तपासणीसाठी पेण स्थानकात आणण्यात आली आणि 10 वाजण्याच्या सुमारास गाडीला नवीन इंजिन लावण्यात आले, परंतु पुन्हा तांत्रिक अडचण आल्यामुळे आणखी तासभर गाडीचा खोळंबा झाला. या गोंधळात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. जनशताब्दीमागून धावणाऱया तीन गाडय़ा एकापाठोपाठ एक लटकल्या.

रेल्वे प्रशासनाच्या बेफिकिरीवर संताप

गाडीच्या बिघाडानंतर प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. यादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या बेफिकिरीचा अनुभव प्रवाशांना आला. पेण स्थानकात एक्सप्रेस गाडय़ा थांबत नसल्यामुळे कॅण्टीनमध्ये चहा-नाश्त्याची मर्यादित सोय होती. त्यामुळे प्रवाशांना उपाशीपोटी गाडी सुरू होण्याची वाट पाहावी लागली. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकाऱयांना पर्यायी व्यवस्थेबाबत विनंती केली, मात्र वरिष्ठ अधिकाऱयांनी प्रवाशांच्या विनंतीला जुमानले नाही. त्यावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला.