
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरातच्या दहशतवाद विरोधी पक्षकाने अरबी समुद्रामध्ये धडक कारवाई करत आंतरराष्ट्रीय सागरी तस्करांचा मोठा डाव उधळून लावला आहे. या संयुक्त कारवाईमध्ये इराणी बोटीसह तब्बल 3 हजार कोटी रुपयांचे 526 किलोग्रॅम हेरॉईन आणि मेथाम्फेटाईन हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आली आहे. तसेच बोटीवरील पाच पाकिस्तानी नागरिकांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
लक्षद्वीप जवळील सागरी हद्दीतून अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती भारतीय तटरक्षक दलाला मिळाली होती. त्यानंतर तटरक्षक दलाने हवाई आणि सागरी पाळत वाढवली होती. एक संशयित इराणी बोट हिंदुस्थानी सागरी हद्दीच्या दिशेने येत असल्याचे स्पष्ट होताच तटरक्षक दलाने जहाजांनी आणि विमानांनी बोटीचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर बोटीला घेरून तटरक्षक दलाच्या पथकाने त्यावर ताबा मिळवला.
दरम्यान, या बोटीतून 526 किलो हेरॉईन आणि मेथाम्फेटामाईन जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याची किंमत 3 हजार कोटींहून अधिक आहे. या बोटीतून 5 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. तटरक्षक दलाने गुजरात एटीएसच्या मदतीने 25 सप्टेंबर 2026 रोजी ही कारवाई केली.
#WATCH | The Indian Coast Guard, operating in coordination with the Anti-Terrorism Squad (ATS), Gujarat, successfully thwarted a major maritime narcotics-smuggling attempt in the Arabian Sea, west of Lakshadweep. Acting on actionable intelligence, the Indian Coast Guard assets… pic.twitter.com/bMLZFuZUJN
— ANI (@ANI) September 30, 2026
दरम्यान, जप्त करण्यात आलेले ड्रग्ज आणि अटक करण्यात आलेल्या पाचही पाकिस्तानी नागरिकांना कडेकोट सुरक्षेत मुंबई बंदरात आणण्यात आले आहे. येथे अमली पदार्थ नियंत्रण कक्ष, एटीएस, सीमाशुल्क आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या संयुक्त पथकाद्वारे त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. हे अमली पदार्थ हिंदुस्थानच्या कोणत्या भागात पोहोचवले जाणार होते आणि यामागे कोणते आंतरराष्ट्रीय नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास सुरू आहे.
























































