
>> प्रकाश कांबळे
सांगली जिल्ह्याच्या अर्थकारणाची आणि सहकार क्षेत्राची भाग्यलक्ष्मी मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकपदांसाठीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, जिल्ह्यातील राजकीय पारा चांगलाच चढला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सध्या नेतेमंडळींची मोठी धावपळ सुरू आहे. मात्र, या निवडणुकीने जिल्ह्यातील राजकीय संस्कृतीचा एक वेगळाच चेहरा समोर आणला आहे. खासदार, आमदार, माजी मंत्री आणि विद्यमान संचालकांच्या वारसदारांची अर्ज दाखल करण्यासाठी धांदल उडाली आहे.
21 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत जिल्ह्यातील राजकीय तडजोडींचे खरे चित्र समोर येईल. मात्र, तूर्तास तरी सामान्य कार्यकर्त्याला डावलून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आर्थिक हितासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळींनी एकमेकांशी हातमिळवणी करत सुरू केलेली धडपड सांगलीच्या सहकार चळवळीतील एका नव्या, स्वार्थी पर्वाची नांदी ठरत आहे, हे नाकारता येत नाही. दरम्यान, सांगली जिल्हा बँकेसाठी 1 नोव्हेंबर 2026ला मतदान, तर 3 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
कार्यकर्ते केवळ ‘सतरंज्या’ उचलण्यासाठीच!
नगरपालिका, महापालिका, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या की, नेतेमंडळी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतात. जनमत चाचपणीचे सोंग वठवतात आणि शेवटी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्याला उमेदवारी जाहीर करतात. कार्यकर्त्यांना ‘तुम्हीच पक्षाचे वैभव आहात’ असे सांगत मैदानात उतरवले जाते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र ही लोकशाही पद्धत पूर्णपणे मोडीत निघालेली दिसते आहे. बँकेच्या माध्यमातून हातात येणाऱ्या प्रचंड आर्थिक नाडय़ा आणि जिल्ह्याच्या राजकारणावर राहणारे वर्चस्व लक्षात घेऊन, सर्वच पक्षांतील प्रमुख नेत्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना अत्यंत हुशारीने बाजूला सारले आहे. ‘कार्यकर्ते फक्त प्रचारासाठी आणि नेते घराण्यासाठी’ अशीच काहीशी परिस्थिती सध्या सांगलीत पाहायला मिळत आहे.
पै-पाहुणे आणि आप्तस्वकीय; मुखवटे बदलून प्रस्थापितांचाच खेळ
सांगली जिल्हा बँकेवर पुन्हा एकदा प्रस्थापित राजकीय घराण्यांचेच नियंत्रण राहावे, यासाठी नेत्यांनी आपापल्या कुटुंबातून मोर्चेबांधणी केली आहे. खासदार विशाल पाटील यांनी स्वतः आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आपले चिरंजीव विराज नाईक यांच्यासाठी, तर आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जतचे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
आमदार जयंत पाटील हे आपले चिरंजीव प्रतीक पाटील यांच्यासाठी हक्काची जागा निवडण्याच्या तयारीत आहेत, तर भाजपचे आमदार सुरेश खाडे आपल्या सूनबाई स्वाती खाडे यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपकडून राहुल महाडिक, सम्राट महाडिक आणि आमदार सत्यजित देशमुख यांनीही शड्डू ठोकला आहे.
या सर्व घडामोडींवरून स्पष्ट होते की, प्रस्थापितांना हटविण्याच्या वल्गना केवळ हवेतच विरल्या असून, प्रत्यक्षात फक्त चेहऱ्यांचे मुखवटे बदलून तोच जुना सत्तेचा खेळ खेळला जात आहे.
पक्षीय वाद बाजूला; पडद्याआड ‘मॅच फिक्सिंग’चे राजकारण
सांगली जिल्हा बँकेत आपली जागा कशी सुरक्षित राहील, यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आपापसातील राजकीय वैर, पक्षांचे झेंडे आणि विचारसरणी तूर्तास गुंडाळून ठेवली आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी किंवा आपापसात जागा वाटून घेता याव्यात, यासाठी छुप्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या राजकीय खेळीवर माजी खासदार संजयकाका पाटील यांनी थेट ‘मॅच फिक्सिंग’चा गंभीर आरोप केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार विशाल पाटील यांच्यात झालेल्या गुप्त भेटीवर त्यांनी बोट ठेवले आहे.



























































