एसटी प्रवाशांसाठी खूशखबर; ‘आवडेल तेथे प्रवास पास’ आता एका क्लिकवर  

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळाच्या बसने महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ एका क्लिकवर मिळणार आहे. एसटीची लोकप्रिय असलेली ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास पास’ ही योजना पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली आहे. महामंडळाच्या वाहतूक खात्याने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

नव्या सुविधेमुळे प्रवाशांना चार आणि सात दिवसांचे पास मिळवण्यासाठी एसटी आगारांमध्ये तासन्तास लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. प्रवाशांना हा पास मिळवण्यासाठी एसटी महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. तिथे आवश्यक ती योग्य माहिती भरून नियमानुसार ऑनलाईन पद्धतीने पास प्राप्त करता येणार आहे. याच अनुषंगाने महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहकांसाठी काही नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार ऑनलाईन काढलेला पास प्रिंट स्वरूपात किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात वाहकाला दाखवला तरी तो वैध मानला जाईल. एसटी वाहक त्यांच्याकडील ईटीआय मशीनद्वारे पासवरील क्यूआर कोड स्कॅन करतील. स्कॅन केल्यावर प्रवाशाचे नाव आणि पासाची वैधता मशीनवर दिसेल. या माहितीची पडताळणी करण्यासाठी प्रवाशाने आपले वैध ओळखपत्र वाहकाला दाखवणे बंधनकारक आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.