
बांगलादेशी घुसखोर आहे म्हणून महिलेची अवहेलना करता येणार नाही. तिच्या अधिकारांचा व सन्मानाचा आदर करायलाच हवा, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने वेश्याव्यवसाय चालवणाऱयाच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
ग्रॅण्टरोड येथे वेश्याव्यवसाय चालवणाऱया एका महिलेला विशेष न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. याविरोधात या महिलेने अपील याचिका दाखल केली. न्या. मिलिंद साठे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. वेश्याव्यवसायात असलेली महिला बांगलादेशी घुसखोर आहे. परिणामी मला शिक्षा ठोठावता येणार नाही, असा दावा आरोपी महिलेने केला.
हा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. पीडित महिला बांगलादेशी घुसखोर असल्याने आरोपीला चुकीच्या गोष्टी करण्याचा परवाना दिला जात नाही. बांगलादेशी महिलेचा सन्मान करायलाच हवा. हिंदुस्थानचा कायदा आरोपीला शिक्षा देण्यासाठी आहे. त्यात कोणत्याही प्रकारची सबब देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
परदेशी महिलेला वेश्याव्यवसायात ढकलणे गुन्हाच
परदेशी महिला हिंदुस्थानात वैध पद्धतीने वास्तव्य करत आहे की नाही हा संपूर्णपणे वेगळा मुद्दा आहे. महिला बांगलादेशी असली म्हणून तिला वेश्याव्यवसायात ढकलता येणार नाही. परदेशी महिलेचेही संरक्षण झालेच पाहिजे, असे न्यायालयाने नमूद केले.





























































