शिवडी स्टेशनसमोर होणार नवीन डीपी रोड; शिवसेनेचा पाठपुरावा, शिवडीकरांचा त्रास वाचणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवडी स्टेशनसमोर लवकरच 20 मीटरचा नवीन डीपी रोड तयार होणार आहे. शिवसेनेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे डीपी रोडचे काम मार्गी लागणार आहे.

सध्या शिवडी स्टेशनसमोर शिवडी-वरळी लिंक रोडचे काम सुरू आहे. त्याच लिंक रोडला समांतर शिवडी रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ला जोडणाऱया पुलाचे कामदेखील थोडय़ा दिवसांत सुरू होणार आहे. शिवडी-वरळी लिंक रोडचे काम पूर्ण झाल्यावर या पुलाच्या खालच्या जागेत  बी. डी. डी. इमारत क्रमांक 9 व 8 मधील जागा ही डी. पी. रोडसाठी आरक्षित करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली होती. सद्यस्थितीमध्ये नागरिकांना चालण्यासाठी इमारत क्रमांक 9 हनुमान मंदिराच्या बाजूने छोटा मार्ग उपलब्ध आहे. पालिकेने ही जागा आता डी. पी. रोडसाठी आरक्षित ठेवण्याचे निश्चित केले आहे. पालिकेच्या ‘एफ’ दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता रोशन जीभकाटे तसेच कनिष्ठ अभियंता सतीश कांबळे यांनी नुकतीच या स्थळाची पाहणी केली. डीपी रोडचा प्रस्ताव लवकरच पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. शिवडी-वरळी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हा रोड तयार करून शिवडीकरांसाठी खुला केला जाणार आहे.