
देशातील ज्या राज्यांमध्ये मतदार यादीचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या ठिकाणी मतदार यादीतून वगळले गेलेल्या पात्र मतदारांची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. पहिल्यांदा मतदान करणारे तरुण आणि युवा मतदार यांची नावेही या मोहिमेदरम्यान नोंदविण्यात येणार आहेत.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून मोठय़ा प्रमाणात नावे वगळण्यात आल्याने देशभरात निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती आणि वादाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांची उच्चस्तरीय बैठक गुरुवारी पार पडली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीनंतर ज्या राज्यांत एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्या ठिकाणी वंचित राहिलेल्या पात्र मतदारांच्या नावांची पडताळणी करून ती नावे यादीत समाविष्ट करण्याचे आदेश आयोगाकडून जारी करण्यात आले आहेत. ही मोहीम एका महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
बीएलओ घरोघरी जाणार
या विशेष मोहिमेअंतर्गत ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ सध्याच्या अंतिम मतदार यादीची तुलना थेट ‘एसआयआर’ लागू होण्यापूर्वीच्या मूळ मतदार यादीशी करतील. ज्या मतदारांची नावे अंतिम यादीतून वगळली गेली आहेत, अशा नागरिकाच्या घरोघरी बीएलओ जाऊन पडताळणी करतील. वगळलेल्या मतदारांचा शोध घेणे हा या पडताळणीचा मुख्य उद्देश आहे.
आठवड्याला 20 ते 25 मतदारांशी संपर्क
एसआयआरपूर्वीच्या यादीत नाव असले, मात्र सध्याच्या यादीत नाव नसलेल्या मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. ही यादी घेऊन प्रत्येक अधिकाऱयाला दर आठवडय़ाला सुमारे 20 ते 25 मतदारांचे प्रत्यक्ष प्रमाणीकरण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जागेवरच फॉर्म 6 भरून घेणार
बीएलओ संबंधित मतदारांच्या घरी जाऊन त्यांची सध्याची परिस्थिती जाणून घेतील. ती व्यक्ती मतदार म्हणून पात्र असल्याचे आढळल्यास त्यांच्याकडून फॉर्म-6 भरून घेतला जाईल. या माध्यमातून त्यांचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया केली जाईल.
राजकीय पक्षांनाही माहिती दिली जाणार
या मोहिमेत पूर्ण पारदर्शकता राहावी यासाठी बीएलओ यांनी तयार केलेल्या याद्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या ‘बूथ लेव्हल एजंट्स’सोबत अधिकृतपणे सामायिक केल्या जाणार आहेत.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याबाबत अंतिम प्रक्रिया करण्याचा अधिकार मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे आहे. यानंतर तयार होणारी बूथनिहाय यादीही राजकीय पक्षांसोबत शेअर केली जाणार आहे.
बेघर आणि कामगारांसाठी विशेष शिबिरे
मतदार नोंदणीची प्रक्रिया सोपी करण्याबरोबरच नाईट शेल्टर, कामगार वसाहती, बेघर नागरिक आणि समाजातील वंचित घटकांतील पात्र व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.
महाराष्ट्रात विशेष काळजी
महाराष्ट्रात एसआयआर प्रक्रिया अद्याप सुरू असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव घाईघाईने हटवू नये, असे निर्देश मतदार नोंदणी अधिकाऱयांना देण्यात आले आहेत. कागदपत्रे व माहितीची संपूर्ण तपासणी केल्यानंतरच नाव वगळण्याचा निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाकडून संबधित अधिकाऱयांना सांगण्यात आले आहे.
‘एसआयआर’ दरम्यान नाव नोंदवले गेले नाही म्हणून कोणत्याही पात्र नागरिकाचा मतदानाचा मूलभूत हक्क हिरावला जाऊ नये.
मतदार नोंदणी ही वर्षभर निरंतर चालणारी अखंड प्रक्रिया असून, एसआयआर संपल्यानंतरही पात्र नागरिकांची नावे यादीत जोडता येतात.
एसआयआर पूर्ण झाले आहे तेथे नव्या मतदारांसाठी फॉर्म-6 सोबत द्यावी लागणारी अतिरिक्त स्वयंघोषणा आता रद्द केली आहे.
3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी शिबिरे
महाराष्ट्राच्या प्रारूप मतदार यादीतील सुमारे 1.22 कोटी नोंदी तपासणीसाठी चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. यापैकी 62.48 लाख प्रकरणे नातेवाईकांच्या माहितीतील त्रुटींशी संबंधित आहेत, तर 59.75 लाख प्रकरणे मागील मतदार यादीतील नातेवाईकाशी मॅपिंगशी संबंधित आहेत. ज्या मतदारांना नोटीस मिळाल्या आहेत त्यांच्यासाठी 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी विशेष शिबिरेही आयोजित केली जाणार आहेत.




























































