
हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाची यशस्वी कर्णधार हरमनप्रीत कौरने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून कर्णधारपदाचा राजीनामा दिला. हरमनप्रीत कौरने घेतलेल्या या निर्णयामुळे चाहतेही चकीत झाले. हरमप्रीतच्या नेतृत्वातच टीम इंडियाने मागच्या वर्षी पहिला वनडे विश्वचषक उंचावला. मात्र, आता कर्णधारपद सोडल्यामुळे संघाची नवीन कर्णधार कोण होणार? यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या चर्चांमध्ये एक नाव आघाडीवर आहे.
हरमनप्रीत कौर कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाली असली तरी क्रिकेटच्या मैदानावर तिचा दमदार खेळ चाहत्यांना पाहता येणार आहे. पण हरमणप्रीत कौरसह संघ कोणाच्या नेतृत्वात मैदानात उतरणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्याच्या घडीला कर्णधार पदाच्या शर्यतीत स्मृती मानधनाचं नाव आघाडीवर आहे. कारण स्मृती उपकर्णधार म्हणून अनेक दिवसांपासून जबाबदारी पार पाडत आहे. तसेच BCCI च्या रिव्ह्यू मीटिंगमध्येही हरमनप्रीतसह ती सामील झाली होती. त्यामुळे हरमनप्रीत कौरनंतर स्मृती मानधना कर्णधार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्मृती मानधनाच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकल्यास तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून मागील 13 वर्षात 120 वनडे सामने खेळले असून 5411 धावा केल्या आहेत. यामध्ये 14 शतके आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 179 टी-20 सामन्यांमध्ये 2 शतके आणि 37 अर्धशतकांच्या जोरावर 4867 धावा चोपून काढल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्येही 9 सामन्यांमध्ये 788 धावा तिच्या नावावर आहेत. यामध्ये 2 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.




























































