
‘स्वच्छ आकाशासाठी स्वच्छ हवा दिन’ (International Day of Clean Air for Blue Skies) 7 सप्टेंबर रोजी पाळला गेला. हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी 2019 मध्ये घोषित केला आणि 2020 पासून त्याचे आयोजन सुरू झाले. स्वच्छ हवा आणि निरोगी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणे, वायू प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणे आणि प्रदूषण कमी करण्यासाठी देशांनी, संस्था आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे. भारताची राजधानी दिल्ली हे सर्वात मोठे उदाहरण आपल्या समोर आहे. दिल्लीतीलच नव्हे, तर भारतातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेमध्ये प्रचंड प्रमाणात प्रदूषण निर्माण झालेले दिसत आहे. वायू प्रदूषणाचे सर्वात मोठे हानीकारक वैशिष्टय़ म्हणजे ते अनेकदा दिसत नाही. मात्र त्याचे परिणाम आपल्या शरीरावर आणि पर्यावरणावर सातत्याने होत असतात. वाहनांमधून निघणारा धूर, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांमधून निर्माण होणारी धूळ, कचरा जाळणे, वीज निर्मितीसाठी जीवाश्म इंधनाचा वापर आणि जंगलातील आगी यामुळे हवेत विविध प्रदूषके मिसळतात. वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिकीकरणामुळे शहरांतीलच नव्हे, तर गावांमध्ये वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, आता स्वच्छ हवेत श्वास घेणे हीदेखील एक महागडी गोष्ट बनली आहे. हवेची घसरत चाललेली गुणवत्ता थेट मानवी आरोग्यावर आणि खिशावर हल्ला करत आहे. कारण शुद्ध हवा घेण्यासाठी आता मास्क घ्यावा लागत आहे. शुद्ध हवेसाठी महागडे एअर प्युरिफायर्स आणि बाहेर पडताना ‘एन-95’सारखे मास्क खरेदी करावे लागत आहेत. श्वसनाच्या विकारांमुळे वैद्यकीय खर्च वाढलेला आहे. औषधे, इनहेलर्स, डॉक्टरांची फी आणि हॉस्पिटलमधील भरतीचा खर्च मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट कोलमडवून टाकतो आहे.
शहरांतील गाडय़ांची वाढती संख्या आणि ट्रफिक जाम ,बांधकाम क्षेत्रातील धूळ उघडय़ावर होणारे मोठे बांधकाम आणि रस्ते दुरुस्ती औद्योगिक उत्सर्जन शहरांच्या जवळील कारखान्यांमधून निघणारा विषारी धूर, कचरा जाळणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने तो उघडय़ावर जाळला जातो. त्याच्या परिणामस्वरूप वायू प्रदूषण होते. हवेतील ‘PM2.5’ आणि ‘PM10’ सारखे सूक्ष्म कण फुप्फुसात खोलवर जातात. त्यामुळे दमा, ब्रॉन्कायटिस आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजचा (COPD) त्रास वाढतो आहे.
हृदयरोग आणि स्ट्रोक
प्रदूषित हवेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो आहे. लहान मुलांची फुप्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात, त्यामुळे त्यांना याचा फटका सर्वाधिक बसतो. वायू प्रदूषण म्हटले की, आपले लक्ष प्रामुख्याने महानगरांकडे जाते. मात्र ग्रामीण भागही या समस्येपासून पूर्णपणे सुरक्षित नाही. शेतीतील अवशेष जाळणे, घरगुती इंधनाचा वापर, लहान उद्योग आणि वाहतूक यांमुळे ग्रामीण भागांतही हवेची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते.
विशेषतः घरातील प्रदूषण हा दुर्लक्षित विषय आहे. पारंपरिक इंधनावर स्वयंपाक केल्यामुळे निर्माण होणारा धूर महिलांच्या आणि मुलांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. त्यामुळे स्वच्छ हवा या संकल्पनेत घरातील आणि बाहेरील दोन्ही प्रकारच्या वायू प्रदूषणाचा विचार करणे आवश्यक आहे. शहरांच्या नियोजनातही बदल आवश्यक आहे. अधिकाधिक काँक्रीटच्या रस्त्यांऐवजी हिरवी क्षेत्रे, झाडे, पादचारी मार्ग आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. उद्योगांसाठी उत्सर्जनाचे कठोर निकष आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीही आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर, शक्य तिथे सायकल किंवा पायी प्रवास, वाहनांची नियमित देखभाल, कचरा न जाळणे, ऊर्जा बचत करणे आणि वृक्ष संवर्धन यांसारख्या छोटय़ा कृतींचाही मोठा परिणाम होऊ शकतो.
आज आपण घेत असलेली हवा केवळ आपली नाही, ती पुढील पिढय़ांचीही आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षणाचा प्रश्न केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही. हवा, पाणी, माती आणि जैवविविधता यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य समजून करावे. ‘स्वच्छ आकाशासाठी स्वच्छ हवा दिन’ आपल्याला एक साधा, पण अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. हवा स्वच्छ ठेवणे ही केवळ पर्यावरणाची जबाबदारी नाही, तर आपल्या आरोग्याचे आणि भावी पिढय़ांच्या अस्तित्वाचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे नव्हे काय?
दत्तप्रसाद शिरोडकर































































