
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. हरमनप्रीत कौर हिने कर्णधारपद सोडल्यानंतर आता नवीन कर्णधार कोण याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती. स्टार फलंदाज स्मृती मानधना हिची महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी, 6 ऑक्टोबर रोजी याबाबत अधिकृत घोषणा केली. दीर्घकाळ भारताचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत कौरने तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडल्यानंतर मानधनाच्या हाती टीम इंडियाची धुरा सोपवण्यात आली आहे.
स्मृती मानधना आता भारतीय महिला संघाची कर्णधार असेल. देशांतर्गत क्रिकेटसोबतच फ्रँचायझी क्रिकेटमध्येही तिने नेतृत्वाची छाप पाडली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी तिच्यासाठी नवी नसली, तरी आता पूर्णवेळ कर्णधार म्हणून तिच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. मानधनाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघ आता नव्या पर्वाला सुरुवात करणार आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टी-20 आणि वनडे संघातही स्मृती मानधनाचे नाव कर्णधार म्हणून आहे.
दरम्यान, हरमनप्रीत कौरने भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाचा तिन्ही फॉरमॅटमधून राजीनामा दिला आहे. मात्र, ती खेळाडू म्हणून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत राहणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 मध्ये पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकला. तिच्या कर्णधारपदातील हा ऐतिहासिक क्षण मानला जातो.



























































