
आदिवासी आश्रमशाळातील गैरसोयींच्या विरोधात नाशिक ते मुंबई असा लाँगमार्च काढून मुंबईत पोहोचलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरूच आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या दादर येथील टिळक भवन कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांना बळजबरीने बसेसमध्ये बसवून नाशिक व जळगावला रवाना केले. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला आहे. तुम्हाला आदिवासींच्या कष्टाच्या घामाचा वास सहन होत नाही का? असा सवाल संजय राऊत यांनी बुधवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.
संजय राऊत म्हणाले की, काल आदिवासी मुलं मुंबईत आली होती. नाशिकमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. ते आपल्या मागण्यांसाठी महाराष्ट्राची राजधानी मुंबई पोहोचले होते. त्यांना रहायला जागा नव्हती, म्हणून ते टिळक भवनात गेले होते. फडणवीस यांनी पोलिसांनी आदेश देऊन त्या विद्यार्थ्यांना फरफटत बाहेर काढले. पोलीस गाड्यांमध्ये कोंबले आणि मुंबईच्या वेशीवर नेऊन सोडले. एमपीएससीचे विद्यार्थी मुंबईत येतील तेव्हाही हेच होणार आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थी आणि एमपीएससीचे विद्यार्थी यांनी एकत्र येऊन हा लढा दिला पाहिजे.
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे काल पुण्यात गेले होते. महाराष्ट्रा काय चालले हे त्यांनी तिथे सांगितले. नोट चोरी, व्होट चोरी, कोंबडी चोरी अशी सगळी काय सिस्टीम आहे ते त्यांनी सांगितले. जवळजवळ विरोधी पक्षाचे सगळे प्रमुख नेते तिथे जाऊन आले. मुख्यमंत्री जर स्वत:ला राज्याचे पालक समजत असतील तर त्यांनी सुद्धा तिथे जायला हवे, उच्च शिक्षण मंत्री आणि राज्यपालांनीही जायला पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
हजारो लोक तिथे बसली असून आंदोलनाचे नेतृत्व रोहित पवार करत आहेत. हा महाराष्ट्राचा, हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आंदोलनामध्ये फूट पाडणे हे आंदोलन संपवण्याचा किंवा प्रश्न सोडवण्याचा मार्ग नाही. देवेंद्र फडणवीस तिथे गेले तर काय बिघडणार आहे. मुलांशी संवाद साधा, चार-पाच लोक फोडायचे आणि चर्चा करायची याला राज्याचे नेतृत्व म्हणत नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.



























































