मुंबईकर विमान प्रवाशांना नवी मुंबईत जाण्यास भाग पाडू नका, मुंबई विमानतळाच्या टी-1 टर्मिनलची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केलीच पाहिजे; आदित्य ठाकरे यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारावर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी बुधवारी तीव्र आक्षेप नोंदवला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी आता मुंबई विमानतळाच्या टी-1 टर्मिनलबाबतच्या मुद्दय़ावर हस्तक्षेप करून आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे, विमान कंपन्या आणि मुंबईकर प्रवाशांना नवी मुंबई विमानतळावर जाण्यास भाग न पाडता मुंबई विमानतळाच्या टी-1 टर्मिनलची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी केलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली.

मुंबई विमानतळावरील व्यवस्थापन आणि गर्दी नियोजनातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून केंद्र सरकार आणि नागरी उड्डाण मंत्र्यांना जाब विचारला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सध्याचे टी-1 टर्मिनल फार पूर्वी बांधलेले नाही. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक असलेले कोणतेही आधुनिकीकरण हे मुंबईकर आणि मुंबईमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय न करता किंवा प्रवाशांची कोणत्याही प्रकारे लूट न करता केले जाऊ शकते आणि केलेच पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. मुंबई विमानतळावरील व्यवस्थापन बदलल्यापासूनच या ठिकाणी गर्दीच्या नियोजनाबाबत गोंधळ दिसून येत आहे. विमानतळावरील प्रत्येक लहान-मोठय़ा गोष्टीचे व्यापारीकरण करण्यात आले आहे. अगदी तासाभराच्या पार्किंगचे दरही अवाढव्य वाढवून त्या माध्यमातून प्रवाशांची लूट सुरू आहेच. त्यात भर म्हणून आता पुरेशी दळणवळण व्यवस्था असो वा नसो, मुंबईकर प्रवाशांना नवी मुंबईला जाण्यास भाग पाडणे हा केवळ टी-1 टर्मिनल चार वर्षांसाठी बंद करण्याचा एक डाव आहे. तसा दावा सुरुवातीला ‘मालका’ने केला होता. त्यानंतर कदाचित सर्व कामकाज पूर्णपणे नवी मुंबईला हलवून मुंबईचा जगाशी असलेला थेट संपर्क आणि प्रवासाची सुलभता संपवली जाण्याची शक्यता आहे, अशी गंभीर भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

हे सर्व नक्की कोणासाठी?

मुंबई विमानतळावरील सध्याच्या गोंधळामुळे जागतिक स्तरावर आपल्या मुंबईची आणि विमानतळाची बदनामीच होत आहे. नवी मुंबई हे एक अतिरिक्त विमानतळ आहे. तात्पुरते पर्यायी विमानतळ नाही, असे सुनावतानाच आदित्य ठाकरे यांनी, हे सर्व नक्की कोणासाठी केले जात आहे, असा खरमरीत सवाल भाजप सरकारला उद्देशून केला.