नागपूर मध्यवर्ती कारागृहात पैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कारागृहातील छोटी गोल विभागातील बैरक क्रमांक 7 आणि 8 दरम्यान हा प्रकार घडला. या हल्ल्यात एक कैदी जखमी झाला असून त्याच्यावर जेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तुरुंग अधिकाऱ्यांनी तक्रारीनुसार धंतोली पोलिसांनी तीन हल्लेखोर पैद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वर्चस्वाच्या वादातून ही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बंदी विजय रहांगडाले हनुमान मंदिरात दर्शन घेऊन बैरककडे परतत असताना दुर्गेश ऊर्फ लिटिल गुप्ता आणि अश्विन ऊर्फ अच्छी इंदुरकर या दोन पैद्यांनी त्याचा रस्ता अडवत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी विजयच्या डोक्यावर प्लॅस्टिकच्या बादलीने वार केला. या हल्ल्यात विजयच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आरडाओरड केल्यानंतर कारागृह कर्मचारी मनोज धनवट यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला असता दुर्गेश व अश्विन यांचा साथीदार पैदी सुरेंद्र ऊर्फ मोनू समुद्रे याने त्यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली तसेच धक्काबुक्की करत धमकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.




























































