
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत दुष्काळग्रस्त तालुक्यातील पात्र लाभार्थी कुटुंबाना मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. याशिवाय दुष्काळामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या लाभार्थ्यांना कोणत्याही शिधावाटप दुकानातून धान्य उचलण्याची सुविधा लागू करण्यात आली आहे.
पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे संकट ओढवलेल्या 265 तालुक्यांमध्ये विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य नियमितपणे मिळावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
गरजू व्यक्तींचाही समावेश
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या व्यक्तीने दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये मोफत अन्नधान्याची मागणी केल्यास विहित निकष, उत्पन्नाची मर्यादा आणि उपलब्ध इष्टांकानुसार त्यांचा अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब प्रवर्गात समावेश करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शिधापत्रिकेवरील सर्व सदस्यांचे आधार सीडिंग पूर्ण करून संबंधितांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
स्थलांतरिताना धान्य उचलण्याची सुविधा
दुष्काळामुळे रोजगार, पाणी किंवा अन्य कारणांसाठी शेतमजूर आणि नागरिकांचे शहरी, निमशहरी किंवा नजीकच्या भागात स्थलांतर होण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ अंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थलांतरित लाभार्थ्यांना त्यांच्या नेमून दिलेल्या शिधावाटप दुकानाव्यतिरिक्त सोयीच्या कोणत्याही दुकानातून ई-पॉस यंत्राद्वारे हक्काचे अन्नधान्य घेता येणार आहे.





























































