सामान्यांच्या मनातील असंख्य भावनांचा एक चेहरा निघून गेला – राज ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने समाजातल्या सामान्य माणसाच्या मनात साठत गेलेल्या असंख्य भावनांचा एक चेहरा आज आपल्यातून निघून गेला, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली वाहिली.

ते पुढे म्हणाले, मुंबईच्या जडणघडणीत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अस्वस्थता उराशी घेऊन जगणारा सामान्य माणूस नाना पाटेकर कधी पडद्यावर तर कधी रंगभूमीवर उभा करत राहिले. ‘हमीदाबाईची कोठी’पासून ते ‘परिंदा’, क्रांतिवीर, ‘अब तक छप्पन’ ते अगदी ‘नटसम्राट’पर्यंत प्रत्येक ठिकाणी नाना पाटेकर दिसत राहिले. नानांच्या अभिनयाकडे बघताना सामान्यांच्या आयुष्यातला भावनांचा प्रेशर कुकर बघतोय असं वाटायचं. नाना असतील किंवा अमिताभ बच्चन असतील, यांनी सामान्यांच्या मनातली वाफ प्रेशर कुकरसारखी पडद्यावर ताकदीने बाहेर काढली म्हणून ठीक, नाही तर या देशात दर महिन्याला अराजकता निर्माण झाली असती. आज चरित्र अभिनेत्यांची जी चलती दिसत आहे, त्याला नानांनी वाट करून दिली.

नानांचा स्वभाव मनस्वी होता. मनात येईल ते बोलायचे. यामुळे नानांना चित्रपटात घ्यायची इच्छा असली तरी निर्माते, दिग्दर्शक टाळायचे. यामुळे नानांचं नुकसान झालं का माहीत नाही. पण हिंदी चित्रपटसृष्टीचं आणि प्रेक्षकांचं नुकसान झालं. विनोदी भूमिकादेखील तितक्याच ताकदीने उभ्या करू शकतो हे त्यांनी जगाला दाखवले. नाना गेले, पण त्यांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आजूबाजूला आहे, असे ते म्हणाले.