
क्रिकेट विश्वातील सर्वाधिक जुनी आणि प्रसिद्ध असलेली मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या (एमएसएसए) हॅरिस शील्ड आणि गाईल्स शील्ड या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेने संघांची डबल सेंच्युरी ठोकत नवा इतिहास रचला आहे. गेल्या वर्षी प्रथमच हॅरिस आणि गाईल्स शील्डमध्ये 200 पेक्षा अधिक शालेय संघांच्या सहभागाची नोंद झाली होती, तर यंदा त्या विक्रमाला मोडीत काढल्याची माहिती एमएसएसएचे क्रिकेट सचिव नदीम मेमन यांनी दिली.
सोमवार, 12 ऑक्टोबरला पोलीस जिमखान्यावर हॅरिस शील्ड स्पर्धेला जनरल एज्युकेशन विरुद्ध स्वामी विवेकानंद या शाळांच्या संघांमध्ये उद्घाटनीय सामना रंगणार आहे. हिंदुस्थानचा माजी कसोटीपटू मोहम्मद पैफच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन केले जाणार आहे. एमएसएसएच्या हॅरिस आणि गाईल्स शील्ड क्रिकेटला जगभरात मानाचे स्थान आहे. मुंबईच्या क्रिकेट संस्कृतीचा अभिमान जागतिक पातळीवर झळकवताना या शालेय स्पर्धांमधून क्रिकेट जगताला अनेक कोहिनूर दिले आहेत. यंदा हॅरिसमध्ये 214 तर गाईल्समध्ये 213 अशा विक्रमी संघांनी सहभाग घेतला आहे. त्याचप्रमाणे मुलींचेही 34 संघ खेळणार आहेत.
एलिट गटात अव्वल 16 संघांचा सहभाग
रणजी करंडकात ज्या पद्धतीने एलिट आणि प्लेट गटात स्पर्धा रंगते तशीच स्पर्धा आता आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा असलेल्या हॅरिस आणि गाईल्स या प्रतिष्ठsच्या स्पर्धांमध्ये पाहायला मिळणार आहे. यंदा दोन्ही स्पर्धा प्रत्येकी पाच-पाच गटांत खेळल्या जाणार असून एलिट गटात गतवेळचे अव्वल सोळा संघ आणि उर्वरित सहभागी संघ चार प्लेट गटात विभागण्यात आले आहेत. प्लेट गटातील विजेते पुढील स्पर्धेसाठी एलिट गटात स्थान मिळवतील. तसेच एलिट गटात तळाला राहिलेल्या चार संघांची प्लेट गटात घसरण होईल. यंदा एलिट गटाची उपात्य फेरीपर्यंतची स्पर्धा 12 ते 29 ऑक्टोबरपर्यंत रंगेल.


























































