
आजपासून सुरू झालेल्या 53 व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड स्पर्धेसाठी जालना जिह्याचे दोन्ही संघटनांचे दोन-दोन संघ आल्यामुळे महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या तात्पुरत्या समितीपुढे कोणत्या संघाला मान्यता द्यावी हा बिकट प्रश्न उभा राहिला होता. दोन्ही जिल्हा संघटना आमचीच संघटना अधिकृत असल्याचा दावा करत होते, पण दोघांपैकी एका संघटनेला मान्यता देणे तात्पुरत्या समितीला शक्य नव्हते आणि असे झाल्यास वाद होण्याची शक्यता होती. त्यामुळे जालना जिल्हा कबड्डी संघटनेच्या नावाने स्पर्धेला आलेल्या या दोन्ही जिह्यांची समजूत काढण्यात अर्जुन पुरस्कारप्राप्त शांताराम जाधव यांना यश आले आणि त्यांनी एकाच जिह्याच्या दोन-दोन संघांना एक संघ म्हणून खेळण्यास सांगितले आणि या जिह्याने मान्यही केले. या एकतेचा परिणाम स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दिसला आणि त्यांच्या कुमार संघाने सिंधुदुर्गचा सहज पराभव केला, तर कुमारी संघाने लातूरची 57-25 अशी धुळधाण उडवली.
जालन्यातील कबड्डी संघटनेत झालेल्या फुटीमुळे सध्या तिथे एकाच नावाच्या दोन संघटना कार्यरत आहेत. या दोघांपैकी धर्मादाय आयुक्तालयाने कोणाला मान्यता दिली आहे हे अद्याप सिद्ध न झाल्यामुळे दोन्ही संघटना मैदानात उतरल्या होत्या; पण या दोघांतील वाद मैदानात उतरण्यापूर्वीच सामंजस्याने सोडविण्यात आला. एका संघटनेचा कुमार संघ चांगला असल्यामुळे त्यांचे 8 खेळाडू, तर दुसऱया संघटनेचे सहा खेळाडू घेऊन 14 खेळाडूंचा संघ तयार करण्यात आला. दुसरीकडे कुमारी संघ तयार करताना एका संघटनेतील 10 आणि दुसऱया संघटनेतील 4 मुलींची निवड करत तगडा संघ तयार करण्याचा फॉर्म्युला मान्य करण्यात आला. या समझोत्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या दोन्ही संघांनी विजयासह बाद फेरीच्या दिशेने धाव घेतली.


























































