महाड एमआयडीसीत स्फोट; चार कामगार जखमी, अ‍ॅस्ट्रॉईड कंपनीतील दुर्घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाड एमआयडीसीतील अ‍ॅस्ट्रॉईड लाईफ सायन्स या कंपनीत आज नायट्रेनची प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेत चार कामगार जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी महाडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १५ दिवसांपूर्वी याच एमआयडीसीतील सिनर्जिया केम या कंपनीत भीषण स्फोट झाला होता. त्यानंतर पुन्हा ही दुर्घटना घडल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नायट्रेनची प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोटाचा मोठा आवाज झाला. त्यामुळे कंपनीतील कामगारांची एकच पळापळ उडाली. चार कामगार या स्फोटात गंभीर जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. या स्फोटामुळे परिसरात विषारी गॅस पसरला. त्यामुळे नागरिकांचे डोळे चुरचुरले आणि त्वचेची जळजळही झाली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.