शिंदे गटाच्या महापौर अश्विनी निकम यांच्या पतीवर गुन्हा दाखल करा, उल्हासनगर पालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर भाजपचा ठिय्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या पाणीपुरवठा सभापती दीपा पंजाबी यांच्या दालनाबाहेर धिंगाणा घालणाऱ्या शिंदे गटाच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यासाठी आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगर महापालिकेवर धडक देत आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे उल्हासनगरात सत्तेसाठी पाठीला पाठ लावणाऱ्या शिंदे गट आणि भाजपमधील वाद चांगलाच उफाळला आहे.

माजी आमदार आणि शिंदे गटात असलेले पप्पू कलानी यांना भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वीच गँगस्टर असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना महापौरांचे पती कमलेश निकम यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मंचेकर टोळीचे ऑपरेटर होते असे सांगत बॉम्बगोळाच टाकला होता. यावरून भाजपचे कपिल अडसूळ यांनी निकम जेथे भेटतील तेथे त्यांना आपण फटकावू, अशी जाहीर धमकीच दिली होती. तसा व्हिडीओच व्हायरल झाल्यानंतर निकम यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसह पालिकेतील भाजपच्या पाणीपुरवठा सभापती दीपा पंजाबी यांच्या कार्यालयाबाहेर जोरदार धिंगाणा घातला. इतकेच नाही तर मी आलोय.. आता येऊन दाखवा, असे चॅलेंजच अडसूळ यांना दिले होते.

परस्परविरोधी तक्रार दाखल
निकम यांनी धिंगाणा घातल्यानंतर भाजपचे प्रदीप रामचंदानी, कपिल अडसूळ, अवी पंजाबी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी निकम आणि अडसूळ यांनी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान भाजपचे पदाधिकारी प्रदीप रामचंदानी यांनी निकम हे महापौर अश्विनी निकम यांचे पती आहेत. त्यांनी पालिकेत येऊन असा धिंगाणा करणे योग्य नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.