गाळा खरेदी करण्याचा बहाणा, बिल्डरचे अपहरण करून दहा लाखांची खंडणी वसूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गाळा खरेदी करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाचे पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण आणि दहा लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोन खंडणीखोरांना गुन्हे प्रकटीकरण कक्ष ३ या पथकाने अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या. रोहित जांगीड आणि वंश गुप्ता अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून ४० लाख ७५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

रोहित जांगीड आणि त्याच्या दोन साथीदारांनी एका बांधकाम व्यावसायिकाला त्यांच्या साईटवरील गाळा विकत घ्यायचा असल्याचे सांगितले. गाळ्याचे पैसे देण्यासाठी या व्यावसायिकाला नालासोपारामधील रेड कार्पेट हॉटेलमध्ये बोलवून घेतले. व्यावसायिक तिथे पोहोचताच आरोपींनी त्यांना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसवले. कारमध्ये बसवल्यानंतर आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून व्यावसायिकाचे अपहरण केले. जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून १० लाख रुपये रोख आणि अंगावरील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या व्यावसायिकाने पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण कक्ष-३ च्या पथकाने तपासाची चक्रे फिरवून रोहित जांगीड (२७) आणि वंश गुप्ता (२१) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.