
तळा शहरात कोट्यवधी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या तळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा पाया चिखलात भरण्यात आला आहे. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केलेला अभियंता साईटवर फिरकत नसल्याने ठेकेदाराकडून थुकपट्टी लावली जात आहे. कामाचा दर्जा व्यवस्थित राखला जात नाही, असा आरोप तळावासीयांनी केला आहे.
तळा नगरपंचायतीची नवीन प्रशासकीय इमारत ज्या ठिकाणी उभी राहणार आहे तिथे मोठी दलदल आहे. ठेकेदाराने चिखल तसाच ठेवून त्यावरच सेंट्रिंग टाकून कॉलमचे काम सुरू केले आहे. खड्यात मोठ्या प्रमाणात चिखलयुक्त पाणी साचलेले आहे. कोणत्याही इमारतीचा पाया हा तिचा कणा असतो. चिखल असलेल्या जागेवर झाकण न करता थेट कॉलम उभे केल्यास भविष्यात इमारतीला तडे जाणे, खचणे असे गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या कामावर देखरेख करण्यासाठी नियुक्त असलेले अभियंता साईटवर फिरकतच नाहीत. त्यामुळे ठेकेदाराकडून अशा पद्धतीचे काम सुरू आहे. याप्रकरणी नगरपंचायत प्रशासनाने तत्काळ साईट पंचनामा करून चिखलात केलेले काम तोडून पुन्हा शास्त्रोक्तपद्धतीने करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांची आहे.
सत्ताधारी, प्रशासनाचे दुर्लक्ष
तळा नगरपंचायतीच्या इमारतीच्या कामावर कोणाचेही अंकुश राहिलेले नाही. संबंधित ठेकेदार हे नगरपंचायतीचा अभियंता उपस्थित नसेल व सुट्टी असेल त्या दिवशीच कॉलम भरण्याचे काम करत आहे. आठ कोटी रुपये खर्चाच्या या कामावर सत्ताधारी व प्रशासन लक्ष नाही. त्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख विलास ठसाळ यांनी व्यक्त केली आहे.


























































